नाशकातील राज ठाकरेंचा ड्रिम प्रोजेक्ट टवाळखोरांचा अड्डा, 8 दिवसात बंदोबस्त करा अन्यथा खळ्ळखट्याक, मनसेचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेलं नाशिकचं बॉटनिकल गार्डन सध्या टवाळखोरांचा अड्डा बनलं आहे.

नाशकातील राज ठाकरेंचा ड्रिम प्रोजेक्ट टवाळखोरांचा अड्डा, 8 दिवसात बंदोबस्त करा अन्यथा खळ्ळखट्याक, मनसेचा इशारा

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेलं नाशिकचं बॉटनिकल गार्डन (Nashik Botanical Garden) सध्या टवाळखोरांचा अड्डा बनलं आहे. नाशिककरांना एकीकडे स्मार्ट सिटीचं गाजर दाखवून कोट्यावधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या सत्ताधारी भाजपने किमान शहरात असलेल्या सुंदर वास्तू जतन कराव्यात असा खोचक सल्ला मनसेनं आता भाजपला दिला आहे. दरम्यान, येत्या 8 दिवसात बॉटनिकल गार्डनमधे येणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त झाला नाही, तर खळ्ळखट्याक करण्याचा इशारा मनसेने दिला आहे (Nashik Botanical Garden).

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला शहरातला एक अत्यंत उत्कृष्ट प्रकल्प म्हणजे नाशिकचं बॉटेनिकल गार्डनं. महापालिकेवर एक रुपयांचा देखील बोजा न टाकता, खुद्द रतन टाटा यांच्या मदतीनं सीएसआरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी हा प्रकल्प उभा केला. अत्यंत दुर्मिळ वनौषधी, बसण्यासाठी सुंदर निसर्गरम्य सिट आउट्स, जंगली प्राण्यांच्या हुबेहुब दिसणाऱ्या प्रतिकृती, फळ, फुल, औषधी, जंगली प्राणी यांची सखोल माहिती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाडांचं आत्मचरित्र सांगणारा एक लेझर शो. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्गाची ओळख करुन देणाऱ्या या बॉटनिकल गार्डनची सध्या मात्र दुरावस्था झाली आहे.

परिसरातील टवाळखोरांमुळे याठिकाणी काम करणारे सुरक्षारक्षकच आता भितीच्या छायेत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे महापालिका कोट्यवधी रुपये खर्चून शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न करत असताना, मनसेच्या काळात उभारलेल्या या कामांकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप मनसेने केला आहे (Nashik Botanical Garden).

बॉटनिकल गार्डन तयार झाल्यानंतर महापालिकेनं या उद्यानाचं सगळं नियोजन, देखरेख आणि जमाखर्च वनविभागाकडे सुपुर्द केला. मात्र, महापालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या एवढ्या सुंदर वास्तूकडे महापालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे वनविभागानेच आता याठिकाणी अधिक सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली आहे.

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत काम सुरु करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र या कामांचा कुठेही लवलेश दिसत नाही. अशात या कामांपोटी सुमारे 500 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च देखील करण्यात आले आहेत. जे काम दिसत नाहीत, त्यांचे कोट्यवधी रुपये अदा केले जातात, मात्र जे काम प्रत्यक्षात उभे आहे, त्याकडे मात्र राजकीय आकसापोटी दुर्लक्ष करण्याचा प्रकार नाशिककरांच्या पचनी पडणारा नाही हे निश्चित.

Nashik Botanical Garden

संबंधित बातम्या :

साखर कारखानदारांना पैसे देता मग शेतकऱ्यासांठी आखडता हात का?; राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Tennis | टेनिसचा आनंद लुटताना ‘राज’स मुद्रा, राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

Published On - 3:58 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI