तू माझी नाही झालीस तर..; महाराष्ट्रात मोठा ड्रामा, भररस्त्यात जे घडलं ते…

नाशिकच्या कामगार नगरमध्ये लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने तरुणीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अपहरणाचा प्रयत्न केला. सातपूर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

तू माझी नाही झालीस तर..; महाराष्ट्रात मोठा ड्रामा, भररस्त्यात जे घडलं ते...
crime love
| Updated on: Feb 26, 2026 | 9:41 AM

नाशिकमधील सातपूर भागातील कामगार नगर परिसरात एकतर्फी प्रेमातून अत्यंत थरारक घटना घडली आहे. एका माथेफिरू प्रियकराने भररस्त्यात तरुणीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आरोपीने मित्रांच्या मदतीने भररस्त्यात तरुणीवर हल्ला करत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल नंबर ब्लॉक केल्याचा आणि लग्नास नकार दिल्याच्या रागातून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती आणि मुख्य संशयित आरोपी यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतराने मुलीच्या कुटुंबियांनी या लग्नास विरोध दर्शवला. कुटुंबियांच्या निर्णयाचा मान राखून तरुणीने संबंधित तरुणाशी असलेले सर्व संबंध तोडले. तिने त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला होता. मात्र, संशयित आरोपीला हा नकार पचवता आला नाही. तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही, अशा धमकीवजा इशारा देत त्याने तरुणीला धडा शिकवण्याचे ठरवले.

यानंतर त्याने तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पीडित मुलगी आपल्या लहान बहिणीसह घराच्या जवळच असलेल्या किराणा दुकानात सामान आणण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी आधीच आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन त्या ठिकाणी गेला. यानंतर संधी मिळताच आरोपींनी तरुणीला अडवले. काही कळायच्या आत आरोपीने खिशातून मिरचीची पूड काढून तरुणीच्या डोळ्यात फेकली.

मिरची पूड डोळ्यात गेल्याने तरुणीला काहीच दिसत नव्हते, याचा फायदा घेत आरोपींनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांना पाहून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत तिथून पळ काढला.

रागातून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती

सुदैवाने, या झटापटीत तरुणीला मोठी इजा झाली नाही. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराला अटक केली आहे. या प्रकरणात एकूण ३ आरोपींचा समावेश असून २ आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, मात्र रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे.