Girish Mahajan : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी, नॉट रिचेबल असलेल्या प्रसाद हिरे, गोकुळ गीतेंबद्दल गिरीश महाजन म्हणाले की..

Girish Mahajan :विधान परिषद निवडणुकीत अनेक जागांवर बंड शमवण्यात काल महायुतीच्या नेत्यांना यश आलं. अपवाद फक्त नाशिकच्या जागेचा. नाशिकमधून गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही.

Girish Mahajan : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी, नॉट रिचेबल असलेल्या प्रसाद हिरे, गोकुळ गीतेंबद्दल गिरीश महाजन म्हणाले की..
Girish Mahajan
| Updated on: Jun 05, 2026 | 8:29 AM

विधान परिषद निवडणुकीत अनेक जागांवर बंड शमवण्यात काल महायुतीच्या नेत्यांना यश आलं. अपवाद फक्त नाशिकच्या जागेचा. नाशिकमधून गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. विधान परिषदेच्या 17 जागांवर महायुती एकत्र निवडणूक लढवत आहे. नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली आहे. तिथून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत.पण जागा वाटप होण्याच्या आधीच भाजपच्या गणेश गीते आणि त्यांचे बंधु गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण गोकुळ गीते यांची उमेदवारी कायम आहे. त्यामुळे नाशिकमधून महायुतीचा उमेदवार निवडणूक आणताना अडचणी येऊ शकतात.

या संदर्भात माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले की, “गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी यासाठी आज मी त्यांना भेटणार आहे. प्रसाद हिरे सुद्धा आहे. तो काल सकाळपासून नॉट रिचेबल होता. गोकुळशी काल सकाळी बोलणं झालेलं” “15-20 मिनिटं मी त्याला समजावलं. मला वाटलं माघार घेतील. पण ते भेटलेच नाहीत. मी आज पुन्हा दोघांना भेटणार आहे” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. “कुठेही बंडखोरी होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. सगळे महायुती म्हणून लढू. आज त्यांची भेट घेणार आहे” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

ते फक्त बोलण्यावर मेहनत करतात

“17 पैकी सहा जागा बिनविरोध झालेल्या आहे. 17 पैकी 17 जागा महायुतीच्या निवडून येतील” असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांच्या टीकेला सुद्धा गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. “त्यांची अति गेली, पोती गेली बडबड केल्याशिवाय पर्याय नाही. 17 पैकी एखादा तर निवडून आणा, तिकडे मेहनत करा ते फक्त बोलण्यावर मेहनत करतात” अशी टीका राऊत यांच्यावर केली. “त्यापेक्षा मैदानात या, लोकांना मध्ये जा, त्यांची ती मानसिकता नाही. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झाली. महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय झालं पुढे बघत रहा” असं गिरीश महाजन म्हणाले.

Follow Us