कॉंग्रेसमध्ये शह काटशह सुरूच, अध्यक्षांना सोडून माजी मंत्र्याच्या नेतृत्वात हाथ से हाथ जोडो, कुठे फुटताय नाराजीचे फटाके?

| Updated on: Mar 18, 2023 | 9:04 AM

सलग तीन कार्यक्रमात कॉंग्रेस पक्षातील गटबाजी उघड झाली आहे. प्रभारी शहराध्यक्ष आणि माजी मंत्री यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेल्याचे यातून दिसून येत आहे.

कॉंग्रेसमध्ये शह काटशह सुरूच, अध्यक्षांना सोडून माजी मंत्र्याच्या नेतृत्वात हाथ से हाथ जोडो, कुठे फुटताय नाराजीचे फटाके?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेसमधील गटबाजी कायम आहे. नाशिक शहर प्रभारी अध्यक्ष म्हणून आकाश छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केल्यानंतर नाशिकमधील गटबाजी या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आली आहे. एकीकडे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी भारत जोडो यात्रा काढून देश एकसंघ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे पक्षाला एकसंघ कधी करणार असा सवाल आता नाशिकच्या राजकारणावरुन उपस्थित होऊ लागला आहे. पक्षातील गटबाजी वारंवार समोर येत असल्याने कॉंग्रेस पक्षात चाललंय तरी काय ? असा सवालही उपस्थित केला जात आहे. हाथ से हाथ जोडो ( Hath se Hath Jodo ) ही मोहीम राबवत असतांना कॉंग्रेसच्या गटबाजीचे पुन्हा दर्शन झाले आहे.

नाशिक शहर प्रभारी अध्यक्षपदी आकाश छाजेड यांची नियुक्ती काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीला मोठा विरोध पाहायला मिळत आहे. यामध्ये माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह माजी अध्यक्षांचा मोठा विरोध दिसून येत आहे.

सलग तीन कार्यक्रमात कॉंग्रेसचे दोन गट बघायला मिळाले आहे. कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला होता. कॉंग्रेस भवनच्या समोर हा जल्लोष केला जात असताना त्यामध्ये कॉंग्रेसच्या अनेकांनी दांडी मारली होती.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसच्या नाराज गटाने पेढे वाटप कार्यक्रम केला होता. त्यामध्येही प्रभारी अध्यक्ष यांच्यासह त्यांच्या गटाचा सहभाग दिसून आला नव्हता. हे दोन्ही नाराजीचे फटाके फुटलेले असतांना आता पुन्हा एकदा जुन्या नाशिकमध्ये गटबाजी उघड झाली आहे.

माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसने राज्यात सुरू केलेल्या हाथ से हाथ जोडो ही मोहीम हाती घेतली आहे. प्रभारी अध्यक्ष आणि त्यांचा गट सोडून इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी दिसून आले असून तिसऱ्यांदा ही गटबाजी दिसून आली आहे.

गटबाजीमुळे राज्यातील पक्षाची वाईट स्थिती झाल्याचे अनेकदा खाजगीत बोललं जातं. मात्र नाशिकमध्ये छाजेड यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेली गटबाजी शहरातही पक्ष रसातळाला घेऊन जाणार अशी चर्चा होऊ लागली आहे. पक्षात आधीच नवचैतन्य निर्माण होण्यासाठी कुणी खमक्या माणूस मिळत नसल्याची स्थिती आहे.

कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले तरीही तिथेही गटबाजी उघड होते. त्यामुळे नाशिकच्या कॉंग्रेसमधील गटबाजी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यापर्यन्त पोहचत नाही का? पोहचली असेल तरीही पटोले त्याकडे दुर्लक्ष करीत तर नाही ना ? अशी चर्चा दबक्या आवाजात नाशिकच्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.