गोदातीरीच्या प्रस्तावीत कब्रस्तानला साधूंचा विरोध, पुढे स्मशानभूमीही नको !

"गोदाकाठ हे पुरण्याचं स्थान असू नये, अशी एकच मागणी आमचे सर्व संत-सज्जन आणि हिंदू समाजाची आहे", असं मत महंतांनी मांडलं. (Nashik Sadhu Mahant oppose to cemetery near Godavari river).

गोदातीरीच्या प्रस्तावीत कब्रस्तानला साधूंचा विरोध, पुढे स्मशानभूमीही नको !
| Updated on: Jan 04, 2021 | 8:02 PM

नाशिक : गोदावरी नदीच्या काठावर स्मशानभूमी किंवा कब्रस्थानला जागा देण्यास साधू महंतांनी विरोध दर्शवला आहे. गोदातीरी कब्रस्थानला जागा देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, गोदावरीच्या काठावर असा कोणताही विधी होऊ नये, अशी साधू-महंतांची भूमिका आहे. त्यामुळे महंत अनिकेत शास्त्री यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देत हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. याशिवाय मागणीची दखल न घेतल्यास आक्रमक पवित्रा घेऊ आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे (Nashik Sadhu Mahant oppose to cemetery near Godavari river).

महापालिका आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर महंत अनिकेत शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भूमिका मांडली. “स्थायी समितीने स्मशान भूमीबाबत जो निर्णय घेतला आहे, याबाबत जो ठराव पास केला आहे त्याला साधू-संतांचा विरोध आहे. गोदाकाठ हे पुरण्याचं स्थान असू नये, अशी एकच मागणी आमचे सर्व संत-सज्जन आणि हिंदू समाजाची आहे”, असं मत त्यांनी मांडलं. (Nashik Sadhu Mahant oppose to cemetery near Godavari river).

“गोदावरी नदी आणि भारतीय संस्कृतीचा उगम हा नदीच्या किनाऱ्यापासून, तटापासून झालेला आहे. तो तट जेवढा सुशोभित, सुंदर आणि निसर्गरम्य ठेवता येईल यासाठी शासनाने पाऊल उचललं पाहिजे. त्या ठिकाणी शासनाने स्मशानभूमी, कब्रस्थान उभारु नये. त्याबाबत आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे. आयुक्तांनी हा ठराव रद्द करावा, अशी मागणी आम्ही निवदेनाद्वारे केली आहे. त्यांनी समाजाला योग्य दिशा द्यावी. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमचं निवेदन स्वीकारलं आहे. त्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे”, असं महंत अनिकेत शास्त्री यांनी सांगितलं.

“निवेदन दिल्यानंतरही मागणी मान्य झाली नाही तर याचे विपरीत परिणाम भविष्यात घडू शकतात. त्या सर्वांची जबाबदारी नाशिक महापालिका, स्टॅडिंग कमिटी आणि त्या कमिटीच्या अध्यक्षांवर राहील. आमची मागणी मान्य झाली नाही तर आमची कडक भूमिका राहील”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकाराल का? नाना पटोले म्हणतात…