प्राणवायूची चिंता नाही, नाशिकमध्ये 4 उद्योग; सिन्नर, अक्राळेमध्ये प्रकल्प उभारणी सुरू

| Updated on: Oct 02, 2021 | 1:39 PM

नाशिक जिल्ह्यात 4 ऑक्सिजन निर्मितीचे उद्योग लवकरच सुरू होणार असून, त्यांनी सिन्नर आणि अक्राळेमध्ये प्रकल्प उभारणीला सुरुवात केली आहे. या खासगी प्रकल्पांना एमआयडीने जमीन दिली आहे.

प्राणवायूची चिंता नाही, नाशिकमध्ये 4 उद्योग; सिन्नर, अक्राळेमध्ये प्रकल्प उभारणी सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात 4 ऑक्सिजन निर्मितीचे उद्योग लवकरच सुरू होणार असून, त्यांनी सिन्नर आणि अक्राळेमध्ये प्रकल्प उभारणीला सुरुवात केली आहे. या खासगी प्रकल्पांना एमआयडीने जमीन दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगभरात तांडव घातले. त्यात लाखो जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्येही प्राणवायूविना अनेकांना तडफडावे लागले. हे सारे ध्यानात घेता राज्य सरकारने विशेष ऑक्सिजन निर्मिती धोरण आणले. त्या धोरणांतर्गत जिल्ह्यात 14 उद्योजकांनी प्रकल्प उभारणीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. आता त्यातील चार लवकरच प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांना एमआयडीने जमीन दिली असून, त्यांनी सिन्नर आणि अक्राळे भागात वेगाने काम सुरू केले आहे. सिन्नर भागात अंश इंजिनीअरिंग आणि टावरी मल्टी गॅसेस, तर अक्राळे (ता. दिंडोरी) येथे पिनॅकल आणि ऑक्सिजन सिटी प्रकल्प उभारला जात आहे. यातील ऑक्सिजन सिटी प्रकल्प हा डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू केला आहे. या प्रकल्पातून प्रतिदिन 80 ते 100 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. सध्या विभागात 8 ऑक्सिजन निर्मित प्रकल्प आणि 17 पुनर्भरण केंद्र सुरू आहेत.

शाळा होणार सुरू
अखेर कोरोना संसर्ग कमी झाला आहे असे मानून नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून शाळांचा श्रीगणेशा होणार आहे. त्यात शहरात 227 तर जिल्ह्यात 2802 अशा एकूण 3029 शाळा सुरू होणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्याच 618 माध्यमिक शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये एकूण विद्यार्थी संख्या 1 लाख 7 हजार 285 आहेत. मात्र, प्रत्यक्षात 62 हजारांच्या जवळपास विद्यार्थीत शाळेत येत आहेत. अनेक पालक अजूनही कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत.

नियमांचे पालन नाही
नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांकडे पाठ फिरवली आहे. जुन्या नाशिकमधील पंचवटी, रामकुंड परिसरात बाजार असो, की इतर ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. शालिमार, अशोकस्तंभ, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह संपूर्ण शहरातही हीच परिस्थिती आहे. विशेषतः अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे.

इतर बातम्याः

भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर

नाशिकमध्ये 48 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान; मदतीसाठी प्रस्ताव पाठवला 38 कोटींचा

नाशिकमध्ये मंगळवारी गोळाबाराची प्रात्यक्षिके; प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास नागरिकांना मनाई

(4 oxygen manufacturing industries in Nashik; Project construction begins in Sinnar, Akrale)