मतदार यादीतून नाशिकमध्ये 73 हजार नावे वगळली, पण तब्बल 2 लाख 87 हजार दुबार नावांचे काय?

| Updated on: Sep 28, 2021 | 11:13 AM

नाशिकमध्ये मतदार यादीतून 73650 नावे वगळण्यात आली आहेत. यातल्या अनेक नावांचे छायाचित्र, पत्ता, नाव सारखे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदार यादीतून नाशिकमध्ये 73 हजार नावे वगळली, पण तब्बल 2 लाख 87 हजार दुबार नावांचे काय?
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये मतदार यादीतून 73650 नावे वगळण्यात आली आहेत. यातल्या अनेक नावांचे छायाचित्र, पत्ता, नाव सारखे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (In Nashik, 73,000 names were omitted from the voter list)

निवडणूक शाखेने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही दुबार नावे शोधली आहेत. ही नावे शोधण्यासाठी प्रशासनाला तब्बल वर्षाचा कालावधी लागल्याचे समजते. मात्र, दुसरीकडे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधल्या मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आला आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर चक्क तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने हा घोळ उघडकीस आणला आहे. त्यांनी तीन महिन्यांत मतदार यांद्याची अक्षरशः छाननी केली. तेव्हा नाशिक पश्चिम मतदारसंधात 1 लाख 22 हजार 242 मतदार दुबार आढले. नाशिक पूर्व मतदारसंघात 88 हजार 932 आणि नाशिक मध्य मतदारसंघामध्ये 76 हजार 319 मतदार दुबार आढळले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे. याअनुषंगाने नागरिकांनी दुबार नावे कमी करण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीमध्ये कोणी जाणीवपूर्वक दुबार नावे सुरू ठेवली असल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा व्यक्तिंविरोधात निवडणूक कायद्या अंतर्गत फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या शुद्धीकरण मोहिमेला किती दिवस लागतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे 73 हजार नावे वगळली, पण तब्बल 2 लाख 87 हजार दुबार नावांचे काय आणि ती कधी वगळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रक्रिया अतिशय किचकट

दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. अनेक मतदारांची नावे ही दोन मतदार संघामध्ये आहेत. त्यामुळे नियमानुसार संबंधित मदाराला नोटीस द्यावी लागेल. त्यातील कोणत्या मदारसंघामध्ये नाव ठेवायचे याची विचारणा करावी लागेल. त्यानंतरच पुढील निर्णय होईल. एकीकडे सॉफ्टवेअर असताना दुबार नावे शोधायला वर्ष लागला. मात्र, या किचकट प्रक्रियेतून पावणेतीन लाख मतदारांची दुबार नावे केव्हा शोधणार, असा प्रश्न आहे.

यापूर्वीही राबवली मोहीम

नाशिकमध्ये 2019 ते 2021 या काळात मतदार यादी संक्षिप्त मोहीम राबवली गेली. त्यातही जवळपास 80605 दुबार नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये 16074 मृत, 15877 दुबार, 48024 स्थलांतरीत नावांचा समावेश आहे. इतके सारे करूनही दुबार नावांचा घोळ सुरू आहे. (In Nashik, 73,000 names were omitted from the voter list)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये पहाटेपासून पावसाची झडझिंबड!

नदी बुजविण्याचे कुटील कारस्थान उघड; नाशिकमध्ये नालेही केले गिळंकृत