अजितदादांनाच जयंत पाटील यांच्या शुभेच्छा, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा; राष्ट्रवादीत चाललं काय?

| Updated on: Sep 25, 2023 | 1:51 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने तर खडसे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

अजितदादांनाच जयंत पाटील यांच्या शुभेच्छा, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा; राष्ट्रवादीत चाललं काय?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव | 25 सप्टेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्रीपद टिकेल की नाही? असं विधान केलं होतं. त्यावर अजित पवार सावध असल्याचं मला समाधान आहे. अन्याय होत असल्यास अजित पवार विचार करतील, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटील यांच्या या विधानावर अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल पाटील यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.

अजित पवार हे नाराज व्हावेत किंवा होऊ नये हे जयंत पाटील यांच्या इच्छेनुसार होत नाही. पण अजितदादांना जयंत पाटील यांच्या शुभेच्छा आहेत एवढं नक्की, असं खळबळजनक विधान अनिल पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अनिल पाटील यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

खडसेंनी प्रयत्न केला

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतही अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे. ज्यावेळी आमचा शपथविधी झाला, त्यावेळी खडसेंनी आमच्याकडे येण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे. मात्र आता तीन पक्षाचे सरकार आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्याबद्दल चर्चा करतील. कोणाला घ्यायचे किंवा कुणाला नाही हे नेतेच ठरवतील. त्यानंतर अजित पवार याबाबत निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खडसे संपर्कात

एकनाथ खडसे हे ज्यांच्या संपर्कात असतात ते माझ्या सुद्धा संपर्कात आहे. अनेक राजकीय विषयावर सुद्धा ते माझ्या संपर्कात आहेत. मात्र ते विषय कोणते हे मला आताच सांगण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी खडसे हे अजितदादा यांच्या संपर्कात असल्याच्या विषयावर सस्पेन्स वाढवला आहे. अजितदादांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याचा सुद्धा विकास होऊ शकतो असा विश्वास त्यांचा झाला असेल. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी संपर्क केला असण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

त्यात तथ्य नाही

एकनाथ खडसे हे जळगावमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. खडसेंना लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करणे म्हणजे हा एक बॉम्ब आहे. यात तथ्य नाही. सध्याच्या परिस्थितीत ज्या ठिकाणी एकनाथ खडसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे ती जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळते की राष्ट्रवादीला मिळते हे काळ ठरवेल. मात्र सध्या तरी एकनाथ खडसेंना लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करणे म्हणजे हा एक बॉम्ब दिसतोय. यात कुठलाही तथ्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.