
नाशिक | 07 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सत्तेचा दावा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही करण्यात येतोय. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय. अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत. नाशिकच्या कळवणमध्ये शेतकरी मेळावा पार पडतोय. यात बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखलवला. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे. तुम्ही तिथं काय करतात? असं काही लोक विचारतात. आम्ही इथं आमची कामं करतो, असं म्हणत अजित पवार यांनी आगामी निवडणुकीसंदर्भातला निर्धार बोलून दाखवला.
उत्तर महाराष्ट्राचं कुलदैवत, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. हजारोंच्या संख्येने भाविक येतात तिथे सुविधा दिलेल्या आहेत. आणखी काय सुविधा द्यायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. तेव्हाच काही लोकांनी सांगितलं की, प्लॅन तयार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होत असते. आराखडा तयार केलाय. सोमवारी होणाऱ्या बैठकीत तो आराखडा मंजूर केला जाईल हा शब्द देतो, असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.
गणेशोत्सव चांगला पार पाडला, आता नवरात्र आणि दसरा चांगला पडावा, यासाठी प्रयत्न करा. चांगला पाऊस पडून धरणं भरावीत, अशीच इच्छा सप्तश्रृंगी देवीकडे व्यक्त केली. तशी प्रार्थना केली, असं अजित पवार यांनी म्हटलं.
नितीन पवार यांनी साखर कारखान्याच्या उल्लेख केला. तो चांगला सुरू आहे. मागेही दिलीप बनकर यांनी एक कारखाना सुरू केलाय. वसंतदादा साखर कारखाना चार तालुक्याचं काम करतो. भाडेतत्त्वावर कारखाना कुणी घेणार असेल तर त्यांना घेऊन या. स्थानिक व्यक्तीला आणा किंवा जो कारखाना चालवतोय त्याला आणा. आर्थिक संकट आले तर पॅकेज देऊ मदत करत आहोतच. बिरसा मुंडा योजने बाबत जास्तीत जास्त निधी देऊ. सिहंस्थ कुंभमेळा 2027 ला आहे त्याअंतर्गत रस्ते करण्याची मागणी आहे, असंही अजित पवार म्हणाले.