
Ashok Kharat Networth: अघोरी पूजा, जादूटोणा करण्याची भीती घालून भोंदू अशोक खरातने अनेकांना गंडा घातला. त्याने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले. अनेक महिलांना वशिकरण आणि नातेवाईकांना ठार करण्याची भीती दाखवून जाळ्यात ओढले. त्यांचा लैंगिक छळ केला. आता खरातची पोलिसांनी वरात काढली आहे. त्याचे संपत्तीचे आकडे अनेकांचे डोळे गरगर फिरवणारे आहेत. त्याची मालमत्ता मोजता मोजता यंत्रणाही थकल्या. त्याच्या संपत्तीचा अजूनही शोध सुरू आहे.
1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SIT ची नजर
भोंदू खरातची आतापर्यंत 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता समोर आली आहे. यामध्ये आलिशान फार्महाऊस, बंगले, मालमत्ता, घर, व्यावसायिक गाळे, दुकानं आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. तर रोख आणि त्याने केलेली गुंतवणुकीचाही शोध सुरू आहे. या 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SIT ची नजर आहे. एसआयटीनं खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती मागितली आहे. खरातच्या मालमतेच्या शोधासाठी एसआयटी आता नोंदणी विभागाची मदत घेत आहे.
ईडी,फॉरेक्स आणि कस्टमचाही ससेमिरा
खरात याने अवैध आणी इतर मार्गांनी अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याने काही व्यावसायिकांना मृत्यूची भीती घालून कोट्यवधीच्या कार, फर्निचर आणि परदेश वारी केल्याचे उघड झाले आहे. त्याविषयीच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे. एकामागून एक धक्कादायक खुलासे याप्रकरणात समोर येत आहे. देवाच्या नावाखाली त्याने सुरू केलेला हा जादूटोण्याचा धंदा त्याच्या अंगलट आला आहे. त्याच्या भांडाफोड झाल्यानंतर त्याच्या राजकीय चेल्यांनी सु्द्धा अंग झटकल्याचे दिसून येत आहे. तर आता खरात याच्या मागे ईडी, फॉरेक्स आणि कस्टमाचाही ससेमिरा लागण्याची चिन्ह आहेत. खरातच्या व्यवहारांची कागदपत्रे ईडीला देण्यात येणार आहे. त्याची आर्थिक कुंडली आता बाहेर येण्याची शक्यता आहे. तर त्याचे कुणाशी आर्थिक व्यवहार होते. त्याचे कोण कोण भागीदार होते यांची नावं सुद्धा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता कोणतीही दैवी शक्ती खरातला वाचवण्यासाठी पुढे येणार नाही हे सध्या तरी पक्कं आहे. त्याचे आणि राजकारण्यांच्या आर्थिक व्यवहारांचे बिंग फुटून कोण कोण अडकते याची सध्या चर्चा सुरू आहे.