दुर्गंधी सुटली म्हणून लोक टेरेसवर पळाले, कोपऱ्यातील गोणी उघडताच… चार दिवसानंतर सत्य आलं बाहेर; नाशिक हादरलं

नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मित्रानेच मित्राचा खून केला आहे. मित्राने 9 हजार रुपये परत केले नाहीत म्हणून दोघांमधील वाद टोकाला गेला.

दुर्गंधी सुटली म्हणून लोक टेरेसवर पळाले, कोपऱ्यातील गोणी उघडताच... चार दिवसानंतर सत्य आलं बाहेर; नाशिक हादरलं
सांकेतिक फोटो
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 23, 2026 | 4:48 PM

नाशिकमधील कामगार नगर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ९ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून झालेल्या या हत्येप्रकरणी आरोपीने मृतदेह आपल्याच घराच्या टेरेसवर पोत्यात भरून ठेवला होता. आजूबाजूच्या रहिवाशांना दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी संशयित आरोपी कृष्णा दुसाने याला नाशिक रोड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. तो मुंबईकडे फरार होण्याच्या तयारीत होता.

घटना कशी उघडकीस आली?

नाशिकच्या महात्मा नगर-कामगार नगर भागातील एका इमारतीच्या टेरेसवर मृतदेह पोत्यात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी शोध घेतला. रात्री उशिरा (सुमारे रात्री ८ वाजता) पोत्यामध्ये तरुणाचा मृतदेह असल्याचे समोर आले. मृत युवकाचे नाव वैष्णव मिलिंद शिंदे असे असून, तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी प्राथमिक तपासात वैष्णवचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट केले आहे.

९ हजार रुपयांच्या वादातून खून

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी कृष्णा दुसाने याने वैष्णव शिंदे याला उसनवार दिलेल्या ९ हजार रुपयांच्या वादातून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून आपल्या घराच्या टेरेसवर लपवून ठेवला होता. आरोपी मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

पोलिस कारवाई

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू असून, अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. ही घटना नाशिक शहरातील कामगार नगर भागात घडली असून, छोट्या आर्थिक वादातून तरुणांचे जीव जाण्याची घटना पुन्हा एकदा चिंता वाढवणारी ठरली आहे. पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस टीम तपास करत आहे.

Follow Us