राष्ट्रवादीने आघाडीतून बाहेर पडावे काय?, छगन भुजबळ यांचा राऊत यांना संतप्त सवाल; महाविकास आघाडीत ठिणग्या?

| Updated on: May 08, 2023 | 12:43 PM

दैनिक 'सामना'तील अग्रलेखावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना हे सर्व आताच उकरून काढायची गरज काय? असा संतप्त सवाल भुजबळ यांनी केला आहे.

राष्ट्रवादीने आघाडीतून बाहेर पडावे काय?, छगन भुजबळ यांचा राऊत यांना संतप्त सवाल; महाविकास आघाडीत ठिणग्या?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आपला वारस तयार करता आला नाही. त्यात ते अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना प्रचंड फटकारलं आहे. संजय राऊत यांना हे सर्व आताच उकरून काढायची काय गरज होती? राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकसा आघाडीतून बाहेर पडावे काय?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ठिणग्या उडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भुजबळ मीडियाशी संवाद साधत होते.

शरद पवार साहेबांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. असं असताना संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावेत? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे ग्रुपवर लक्ष दिलं असतं तर…

तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवार साहेबांचं राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते, त्यांना माहीत. इतकं लक्ष त्यानी शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅगवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला आहे.

सावध प्रतिक्रिया

बजरंग दलावर बंदी घातली पाहिजे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर धार्मिक आणि विषारी प्रचार जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. त्यांच्यावर या पूर्वी बंदी घालण्याची मागणी झाली आहे. पण आता कोणी किती विषारी प्रचार करत आहे, हे मला माहीत नाही, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भुजबळांचा सल्ला

द केरळ स्टोरी या सिनेमावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या चित्रपटात चुकीचे दाखवण्यात आले आहे, पण मला फारशी माहिती नाही. समाजात आणि धर्माधर्मात तेढ निर्माण होईल अशा गोष्टी टाळण्यात आल्या पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.