उद्धव ठाकरे यांचा मास्टर प्लॅन, आता थेट मालेगाव, संजय राऊत यांच्याकडून महत्त्वाची माहिती

| Updated on: Feb 27, 2023 | 7:18 PM

पुढच्यावर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. या आगामी निवडणुका आणि शिवसेना पक्षाची झालेली हानी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मास्टर प्लॅन आखला आहे.

उद्धव ठाकरे यांचा मास्टर प्लॅन, आता थेट मालेगाव, संजय राऊत यांच्याकडून महत्त्वाची माहिती
Follow us on

नाशिक : शिवसेना (Shiv Sena) पक्षात फूट पडल्यानंतरही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हार मानलेली नाही. विशेष म्हणजे ही फूट भरुन काढण्यासाठी ते आणखी जोमाने कामाला लागले आहेत. राज्यात आगामी काळात अनेक मोठ्या शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याशिवाय पुढच्यावर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. या आगामी निवडणुका आणि शिवसेना पक्षाची झालेली हानी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मास्टर प्लॅन आखला आहे. उद्धव ठाकरे यांनी कामाची एक अनोखी रणनीतीच आखल्याची माहिती मिळत आहे. याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वत: माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे एकीकडे विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे संघटना मजबूत करण्याकडे त्यांचा प्रचंड कल आहे. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आगामी निवडणुकांसाठी जोरदार कामाला देखील लागले आहेत. त्यांच्या या मास्टर प्लॅनबद्दल खासदार संजय राऊत नकळतपणे पत्रकार परिषदेतून बोलून गेले आहेत. राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत ठाकरे गटाच्या अंतर्गत हालचालींविषयी माहितीच देऊन टाकली आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची 26 मार्चला मालेगावात सभा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील या सभेला सर्वात जास्त महत्त्व असणार आहे. मालेगावात मुस्लिम समुदायाची संख्या देखील चांगली आहे. उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची भावना ही सर्वसमावेशक अशी झालेली आहे. त्यामुळे मालेगावात जाऊन ते सर्वधर्म समभावाचा संदेश तर देतीलच. पण ते तिथल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार, याकडे सर्वाचं लक्ष लागणार आहे. त्यामुळे त्यांची ही सभा सर्वात जास्त महत्त्वाची असणार आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत निवडणुकांबद्दल महत्त्वाचं विधान केलं. राज्यात कधीही निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत, असं राऊत म्हणाले आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच कामाला लागले आहेत. मालेगावातील त्यांची सभा ही देखील त्याचाच एक भाग असण्याची शक्यता आहे.

संजय राऊत काय-काय म्हणाले?

“आमच्या विरोधात जे चोर, लफंगे निर्माण झाले आहेत त्यांना मोडून काढायचं, असं राज्यातील जनतेनं ठरवलेलं आहे. महाराष्ट्रातील चित्र जे आम्ही पाहतोय ते झपाट्याने बदलतंय. निवडणुका कधीही झाल्या तर आम्ही तयार आहोत. महापालिका, विधानसभा निवडणुका कधीही होऊद्या. आम्ही तयार आहोत. त्यांच्याविरोधातील जनतेचा असलेला रोष आणि उत्साह बघून ते निवडणुका पुढे ढकलत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यापासून पोलीस यंत्रणेचा भयंकर दुरुपयोग सुरु आहे. आमचे आमदार-पदाधिकाऱ्यांना एसीबीच्या नोटीस आल्या. त्यांच्या चौकशा सुरु आहेत. महाराष्ट्रात आणि जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे तिथे दबावाचं राजकारण करुन सरकार पाडली जात आहेत किंवा सरकार स्थापन केलं जातंय. या विरुद्ध देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संघर्ष करावा, अशी भूमिका ठरली आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्रीवर येऊन गेले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा सुरु असते. विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरु असते. कारण एकत्र येऊन लढल्याशिवाय ही झुंडशाही संपणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.