गिरीश महाजनांच्या त्या फोटोची चौकशी करा, हनी ट्रॅपप्रकरणी संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात ७० पेक्षा जास्त अधिकारी आणि माजी मंत्री अडकले असल्याचे वृत्त आहे. प्रफुल्ल लोढा याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि हनी ट्रॅपचे आरोप आहेत. त्याला अटक झाली असून, संजय राऊत यांनी लोढा आणि गिरीश महाजन यांच्या फोटोग्राफची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गिरीश महाजनांच्या त्या फोटोची चौकशी करा, हनी ट्रॅपप्रकरणी संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब
| Updated on: Jul 21, 2025 | 9:38 AM

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असे साधारण ७० पेक्षा जास्त जण या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या हनी ट्रॅप प्रकरणी सध्या चौकशी सुरु असून विविध खुलासे होताना दिसत आहे. आता या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहेत. आता याच प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांचा एक फोटो ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

नेमकं प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथील मूळ रहिवासी असलेला ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा याच्यावर नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे, त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून प्रसारित करण्याची धमकी देणे आणि मुलींना डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपांवरून मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशन आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात पॉक्सो, बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी लोढाला अटक केली आहे.

कथित समाजसेवक म्हणून वावरणाऱ्या प्रफुल्ल लोढाचा मुंबईतील चकाला परिसरात ‘चकाला हाऊस’ नावाचा बंगला आहे. येथेच त्याने एका १६ वर्षीय मुलीवर तिच्या मैत्रिणीसह अत्याचार केल्याचा, तिचे अश्लील फोटो काढून प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आणि तिला घरात डांबून मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ३ जुलै रोजी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि ५ जुलै रोजी लोढाला अटक करण्यात आली. यानंतर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर पॉक्सो, बलात्कार, खंडणीसह हनी ट्रॅपचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यातच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाला भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी हा दावा केला आहे. प्रफुल्ल लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला. आता या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी ट्वीट बॉम्ब टाकला आहे.

संजय राऊत ट्वीट

संजय राऊत यांनी नुकतंच ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन यांना पेढा भरवताना दिसत आहे. या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध पानी का पानी होईल! ४ मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेव्हा) याच ट्रॅपमुळे पळाले,” असा खळबळजनक दावाही राऊत यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण तापले आहे.