जगातील सर्वात फास्ट बॅगेज क्लेम व्यवस्था; नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार? काय असणार खासियत

नवी मुंबईमधील नवे विमानतळ कधी सुरु होणार? त्याची खासियत काय असणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जगातील सर्वात फास्ट बॅगेज क्लेम व्यवस्था; नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार? काय असणार खासियत
Navi Mumbai Airport
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 12, 2025 | 2:03 PM

नवी मुंबईतील विमानतळाचे काम पूर्ण होत आले आहे. आता लवकरच हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. हे विमानतळ कधी सुरु होणार तसेच या विमानतळाची खासियत काय असणार? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच या विमानतळासाठी एक मोठी कनेक्टिव्हिटीही तयार करणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘आज नवीन मुंबईत विमानतळ याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी आणि शिंदे आलो. आता त्याच्या प्रगतीसाठीचं सादरीकरण पाहिलं. रनवे पासून टर्मिनल बिल्डिंग पर्यंतची प्रगती पाहिली. साधारणपणे याची भौतिक प्रगती ९४ टक्के झाली आहे. रनवे सुसज्जित आहे. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालं. इंटिरियरचं काम सुरू आहे. बाहेरच्या सिलिंगचं काम वेगानं सुरू आहे. बॅगेज हँडलिंगची सिस्टिम पाहिली. अत्यंत चांगली सिस्टिम आहे. बॅगेचा बारकोड ३६ डिग्रीतून पाहता येईल. ती योग्य ठिकाणी जाईल. या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही व्यवस्था ही जगातील फास्टेट व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा पूर्ण एअरपोर्ट होईल तेव्हा दोन रनवे या क्षमतेने ९ कोटी प्रवाशांसाठी एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा बराच मोठा एअरपोर्ट होणार आहे. हा ग्रीन एअरपोर्ट आहे. ग्रीन वीज वापरली जाणार आहे, अल्टरनेट फ्यूलची वाहने असणार आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा: पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढवणारे मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?

‘एक मोठी कनेक्टिव्हिटीही तयार करणार’

पुढे ते म्हणाले, ‘आपली विमाने जी फ्यूल वापरतात ती ग्रीन असेल हा प्रयत्न असेल. एक मोठी कनेक्टिव्हिटीही आपण तयार केली आहे. वॉटर ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली जाणार आहे. शहरातच बॅगेज चेकिंगची व्यवस्था करू. त्यांना बॅगेज शिवाय येता येणार आहे. अंडर ग्राऊंड मेट्रो एअरपोर्टला तयार करू. ती सर्व एअरपोर्टला कनेक्टेड असतील. त्यामुळे पायी चालावं लागणार नाही. तसेच वाहन घेऊन येण्याची गरज पडणार नाही.’

कधी सुरु होणार विमानतळ?

नवी मुंबईतील विमानतळ कधी सुरु होणार याविषयी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘काही विमानतळावर एक एक किलोमीटर पायी चालावं लागतं. इथे ट्रॅव्हलेटर तयार करण्यात आलं आहे. देशातील सर्वात आधुनिक एअरपोर्ट तयार होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचं टार्गेट दिलं आहे. पंतप्रधानांचीही वेळ घेणार आहे. १३ ते १४ हजार कामगार रोज काम करत आहे. कामगारांची संख्या दुप्पट तिप्पट वाढवायला सांगितली आहे.’