ना मोबाईल, ना सोशल मीडिया… रेल्वे स्थानकावर झोपलेल्या 150 मजुरांमधून शोधला आरोपी, एका खूनाचा असा झाला रहस्यमयी उलगडा
नवी मुंबईतील एका खुनाचा गुंतागुंतीचा तपास सीबीडी पोलिसांनी 7 दिवसांत यशस्वीपणे पूर्ण केला. मोबाईल किंवा सोशल मीडियाचा कोणताही सुगावा नसताना, पोलिसांनी 150 हून अधिक मजुरांमधून आरोपींना शोधून काढले. मृत व्यक्तीची ओळख पटवून मुंबई आणि पुणे येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली, ज्यांनी अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केला होता. हे पोलिसांचे कौशल्यपूर्ण कार्य आहे.

रवी खरात, प्रतिनिधी, नवी मुंबई : सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किल्ला सिग्नल परिसरातील नवी मुंबई महानगरपालिका स्मशानभूमीजवळ एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. कोणताही ठोस सुगावा नसताना सीबीडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत मृत व्यक्तीची ओळख पटवली आणि दोन आरोपींना मुंबई तसेच पुणे येथून अटक केली. अवघ्या 7 दिवसांत हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
17 एप्रिल 2026 रोजी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. 90/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबई महानगरपालिका स्मशानभूमी, किल्ला सिग्नल येथील ग्रीन परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून मृताच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे समोर आले.
दोन आव्हाने
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2 बेलापूर, सहाय्यक पोलीस आयुक्त, सीबीडी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली. घटनास्थळी मिळालेल्या भौतिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण करून मृत व्यक्ती आणि संशयित आरोपी यांच्या हालचालींचे ठिकाण निश्चित करण्यात आले. या गुन्ह्यात पोलिसांसमोर दोन मोठी आव्हाने होती. पहिले म्हणजे मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि दुसरे म्हणजे अज्ञात आरोपींचा शोध घेणे. त्यासाठी एकूण तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी दिवसरात्र तपास सुरू ठेवला.
60 ते 65 सीसीटीव्ही फुटेज
तपासादरम्यान घटनास्थळ आणि परिसरातील सुमारे 60 ते 65 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख आकाश प्रकाश राठोड, वय 29 वर्षे, मूळ राहणार नवसारी, गुजरात अशी पटली. त्याचबरोबर दोन संशयित आरोपींची नावेही पोलिसांनी निष्पन्न केली.
मात्र आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी अत्यंत जिकिरीचे ठरले. आरोपी हे मिळेल त्या ठिकाणी बिगारीकाम करून मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील फुटपाथवर तसेच ब्रिजखाली राहत असल्याची माहिती समोर आली. त्यांच्याकडे मोबाईल फोन, सोशल मीडिया किंवा इतर कोणतीही साधने नसल्यामुळे त्यांचा माग काढणे कठीण झाले होते. तरीही पोलिसांनी बातमीदारांचे जाळे सक्रिय करून आरोपींच्या हालचालींबाबत माहिती गोळा केली.
या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पहिल्या आरोपीस 24 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री मुंबईतील कॉटनग्रीन स्टेशनसमोर झोपलेल्या अंदाजे 100 ते 150 हातमजुरांच्या गर्दीतून शोधून ताब्यात घेतले. तर दुसऱ्या आरोपीचा पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरात शोध घेण्यात आला. तो गर्दीत लपून काम करीत असताना 28 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.