झोपेत असतानाच इमारतीचा स्लॅब डोक्यावर पडला, तरुणाला 22 टाके; नेरुळमध्ये खळबळ

| Updated on: Jun 13, 2021 | 10:37 AM

सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे सेक्टर 48 मधील सी 18/1 स्नेहमिलन सोसायटीत शनिवारी रात्री ही घटना घडली. या सोसायटीतील रहिवासी विश्राम लोंढे हे झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब त्यांच्या डोक्यात पडला. | slab fall on head

झोपेत असतानाच इमारतीचा स्लॅब डोक्यावर पडला, तरुणाला 22 टाके; नेरुळमध्ये खळबळ
स्लॅब डोक्यात पडला
Follow us on

नवी मुंबई: मालाड मालवणीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील नेरुळमध्येही इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. रात्रीच्यावेळी झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री नेरुळ येथे ही घटना घडली. मात्र, या घटनेमुळे नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (building Slab fall on head of youth injured get 22 stitches)

सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे सेक्टर 48 मधील सी 18/1 स्नेहमिलन सोसायटीत शनिवारी रात्री ही घटना घडली. या सोसायटीतील रहिवासी विश्राम लोंढे हे झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब त्यांच्या डोक्यात पडला. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या डोक्याला 22 पेक्षा जास्त टाके मारण्यात आले. त्याचबरोबर त्यांना एका ठिकाणी डोक्याच्या आतील भागापर्यंत मार लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवसानंतर त्यांच्या डोक्याचा एमआरआय करण्याच्या सूचनाही डॉक्टरांनी दिल्या आहेत.

दोन मिनिटे… आणि पत्नी, मुलगा वाचला

ही घटना घडली त्याच्या दोन मिनिटे आधीच त्यांची पत्नी व मुलगा झोपेतून उठून किचनमध्ये गेले होते. त्यामुळे या दुर्घटनेतून ते सुदैवाने बचावले. या घटनेमुळे सिडकोच्या निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडको आणि महापालिकेने या निकृष्ट इमारतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी माजी नगरसेवक भारत जाधव यांनी केली आहे. तसेच भविष्यातही इमारतीचा स्लॅब कोसळून कुणाचाही मृत्यू होऊ शकतो. त्याला सिडकोच जबाबदार राहील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मालाडमध्ये इमारत कोसळली

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात दोन दिवसांपूर्वीच इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश होता. तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश होता. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

(building Slab fall on head of youth injured get 22 stitches)