
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रायगड | 6 जानेवारी 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकाराच्या मुद्द्यावरून लोकांना सावध करतानाच भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज वर्तवून सावध केलं आहे. तुमच्या जमिनीचे पट्टे तुमच्या हातून जाऊ शकतात. जेव्हा जेव्हा रस्ते, पूल तयार होतात तेव्हा तेव्हा जमिनी गिळंकृत केल्या जातात. त्यामुळे सावध राहा. सतर्क राहा. तुमच्या जमिनी हडप केल्या जातील. राज्यात वेगळ्या प्रकारची सहकार चळवळ सुरू आहे. ही सहकार चळवळ नसून सहारा चळवळ आहे. ती तुमच्या विरोधातील आहे. महाराष्ट्राच्या विरोधातील आहे. त्यामुळे सतर्क राहा, अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हातजोडून कळकळीची विनंती केली आहे.
रायगडमध्ये मनेसचं कार्यक्रम पार पडला. यावेळी सहकार चळवळीवर बोलताना राज ठाकरे यांनी ही कळकळीची विनंती केली. जेव्हा जेव्हा रस्ते झाले तेव्हा तेव्हा आपल्या हातून जमीन गेल्या आहेत. उद्या हा रायगड जिल्हा तुमच्या ताब्यात राहणार नाही. इथे विमानतळ येणार. मुंबईला लिंक होणारा रस्ता येतो. हे सर्व झाल्यावर इतर राज्यातील लोक येणार आणि तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्या जागा विकत घेणार. उद्या तुम्ही मराठीही बोलणार नाही. त्यांचीच भाषा बोलणार. तुम्हाला धोक्याची सूचना आहे. हातजोडून विनंती आहे. तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे ना. सतर्क राहा, असं राज ठाकरे म्हणाले.
प्रत्येक ठिकाणी इमारती गिळंकृत केल्या जात आहेत. जमिनीचे पट्टेच्या पट्टे काढून घेतले जात आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची… महाराष्ट्राच्या विरोधातील एक प्रकारची सहकार चळवळ आहे. ती आपल्या विरोधातील आहे. महाराष्ट्राच्या विरोधातील आहे. बाबांनो समजून घ्या… उद्या हातातून या गोष्टी जातील ना तेव्हा तुम्हाला पश्चात्तापाचा हात कपाळावर मारत बसावं लागेल. मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो. मी तुम्हाला सहकार चळवळ समजून सांगण्यासाठी आलो नाही. स्टेजवर तज्ज्ञ आहेत, ते तुम्हाला सहकार चळवळ समजावतील. मी फक्त तुम्हाला धोके सांगत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या विरोधातील ही सहकार चळवळ सुरू आहे, ती नेमकी नीट ओळखा. कारण आपले नेते लाचार झाले आहेत. मिंधे झाले आहेत. पैशाने वेडे झाले आहेत. त्यांना स्वत्व कळत नाही. त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही, आज इकडून तिकडे गेले, तिकडून इकडे गेले. घरी गेल्यावर घरचेही विचारत असतील आज कुठे आहात?, असा हल्लाच राज यांनी चढवला.
सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. आताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नाही. ती सहारा चळवळ, आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या. सर्वांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं ही सहारा चळवळ नाही, असा हल्ला चढवतानाच महात्मा फुलेंनी राज्यात सहकार चळवळ सुरू केली. महाराष्ट्रातील जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये म्हणून ज्योतिबा फुलेंनी आंदोलन केलं होतं. आज महाराष्ट्रात सहकारी संस्था 2 लाख 22 हजाराच्यावर आहे. इतक्या मोठ्या संस्था कोणत्याही राज्यात नाही. त्यानंतर गुजरातमध्ये आहे. गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. कालची बातमी आहे. महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करते की काय अशी परिस्थिती आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
उद्या मराठवाड्याचं वाळवंट होण्याची भीती आहे. ऊसासाठी पाण्याचा ऊपसा केला जात आहे. उद्या मराठवाड्याचा वाळवंट झाला आणि ती जमीन पूर्ववत करायची असेल तर 400 ते500 वर्ष लागतील. आपणच आपल्यात भांडत आहोत. आपण जातीवरून भांडतोय. हे चालू नाही. हे चालवलं जातं. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे आतल्या लोकांना कळत नाही. राज ठाकरे बोंबलून सांगत आहे. राज्याचं जे जे चांगलं आहे ते बाहेर काढा. बाहेर निघत नसेल तर ते उद्ध्वस्त करा, असं सुरू आहे, असंही ते म्हणाले.
घराच्या जमिनीचा तुकडा हे तुमचं अस्तित्व आहे. महाराष्ट्रात राहतो याला लॉजिक काय? आजपर्यंत जेवढी युद्ध झाली त्याला इतिहास म्हणतात. जगातील कोणताही इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. भूगोल म्हणजे जमीन. तुम्ही मोगलांपासून पहिलं आणि दुसरं महायुद्ध पाहिलं तर जमिनीसाठीच युद्ध झालं आहे. ही जमीन ताब्यात घेणं याला इतिहास म्हणत आलो आहोत. आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे. पूर्वी लढायच्या व्हायच्या. तेव्हा कळायचं जमीन हडप करायला आले. आता राजकीय दृष्ट्या हळूच सर्व गोष्टी काढून घेत आहेत, अशी टीकाच त्यांनी केली.