Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-19 मध्ये तलवार आणि चॉपरने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून दोन तरुणांनी एका मुलावर हल्ला केला, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या आईलाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. तेथील एक मेडिकलजवळ असलेल्या शिवसेना शाखेसमोर दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला, त्याला मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्या मुलाला वाचवण्यासाठी, तो वाद मिटवण्यासाठी जेव्हा त्या तरूणाची आई पुढे आली तेव्हा हल्लेखोरांनी तिलाही जुमानलं नाही अन् तिच्यावर जोरदार हल्ला केला . तिच्या डोक्याला यात गंभीर दुखापत झाली. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण असून स्थानिक रहिवाशी भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. आरोपींकडे तलवार तसेच चॉपर आढळल्याने कायदा-सुव्यववस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
किरकोळ वादातून हिंसाचार
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे गावातील सेक्टर-19 परिसरात काही तरुण नियमितपणे योगिता मेडिकलजवळील घरासमोर बसत असत. याबाबत एका स्थानिक महिलेने त्यांना विरोध केला होता. या कारणावरून आरोपींनी संताप व्यक्त करत पीडित तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यादरम्यान त्याच्या आईने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिच्यावरही हल्ला करून डोक्यात मारहाण केली. या घटनेत दोघांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याचा व्हिडीओही समोर आला असून आरोपींकडे तलवार आणि चॉपरसारखी धारदार शस्त्रं त्यात स्पष्टपणे दिसून आली. त्यांनी या शस्त्रांचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रांचा वापर झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नशेच्या प्रभावाखाली हल्ल्याचा संशय ?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अमली पदार्थांच्या किंवा मद्याच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या अनुषंगानेही तपास सुरू असून आरोपींची पार्श्वभूमी, त्यांचे गुन्हेगारी संबंध आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
मात्र या घटनेनंतर कोपरखैरणे परिसरातील नागरिकांनी वाढती गुन्हेगारी, खुलेआम फिरणारी धारदार शस्त्रे आणि अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परिसरात पोलीस गस्त वाढविणे, समाजकंटकांवर कठोर कारवाई करणे आणि नशेच्या अवैध व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.