ठाकूरवाडी गाव दरडग्रस्तांच्या यादीतच नव्हतं, मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली; चौकशीचं आश्वासन

| Updated on: Jul 20, 2023 | 9:06 AM

दरडग्रस्त गावांच्या यादीत या गावाचा समावेश नव्हता. ही चूक कुणाची ते नंतर पाहू. आधी मदतकार्य करण्यास प्राधान्य देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ठाकूरवाडी गाव दरडग्रस्तांच्या यादीतच नव्हतं, मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली; चौकशीचं आश्वासन
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खालापूर | 20 जुलै 2023 : खालापूर जिल्ह्यातील ठाकूरवाडी गावावर दरड कोसळल्याने या दुर्घटनेत पाच लोक दगावले आहेत. तसेच 34 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तब्बल 100 लोक या दरडीखाली दबल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे गाव दोन डोंगरांच्यामध्ये आहे. तरीही या गावाचा दरडप्रवण गावांच्या यादीत समावेश करण्यात आला नसल्याचं उघड झालं आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

खालापूरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पण पावसामुळे अडथळे येत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि स्थानिक लोकांच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

दोन हेलिकॉप्टर तैनात

या दुर्घटनेतील लोकांना मदत करण्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. मात्र हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरचा वापर करता येत नाही. हवामान क्लिअर झाल्यावर हेलिकॉप्टरद्वारे मदतकार्य करण्यात येणार आहे. हे गाव उंचावर आहे. दोन डोंगराच्यामध्ये ही वस्ती आहे. गाडी जाऊ शकत नाही. त्यामुळे जेसीबी किंवा पोकलेनच्या सहाय्याने मदत करता येत नाही. ही अडचण आहे. पाऊस आहे. हवामान खराब आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

चूक कुणाची नंतर पाहू

गिरीश महाजन, महेश बाल्दी घटनास्थळी आहे. डोंगरावर जाऊन ते पाहणी करत आहेत. आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच दरडग्रस्त गावांच्या यादीत या गावाचा समावेश नव्हता. ही चूक कुणाची ते नंतर पाहू. आधी मदतकार्य करण्यास प्राधान्य देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मदतकार्य वेगाने

इर्शाळवाडी येथे वेगाने मदतकार्य सुरू आहे. इथे 45 घरांची वस्ती आहे. दरड कोसळल्याने 15 ते 17 घरे दबली आहेत. पाऊस सुरू आहे. गाड्या जाऊ शकत नाहीत. जेसीबीही जाऊ शकत नाही. त्यामुळे मॅन्युअली काम सुरू आहे. जवान जीव लावून काम करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेल्पलाईन नंबर

8108195554