Chhagan Bhujbal : पंकजा मुंडे नवीन पक्ष काढणार? छगन भुजबळांनी दिली मोठी हिंट, म्हणाले त्या लगेच..

गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असे पंकजा मुंडेंनी म्हटले होते.

Chhagan Bhujbal : पंकजा मुंडे नवीन पक्ष काढणार? छगन भुजबळांनी दिली मोठी हिंट, म्हणाले त्या लगेच..
छगन भुजबळ
| Edited By: | Updated on: Feb 10, 2025 | 1:39 PM

“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मुंडे यांची कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. “पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील”,असे ते म्हणाले होते. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळांनी जागवल्या आठवणी

“स्वर्गीय मुंडे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट सांगू शकतो. 2002 ची गोष्ट असेल,मी उपमुख्यमंत्री होतो. गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले एक वेगळा पक्ष काढू. तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू असं म्हणाले. पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, मी उपमुख्यमंत्री होतो म्हटलं मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असंही सांगितलं. मी सांगितलं माझी काही हरकत नाही, इतर लहान घटकांना घेऊन पक्ष निघत असेल तर हरकत नाही असंही म्हटलं. पण नंतर त्यांनी तो विषय सोडून दिला, अशी आठवण छगन भुजबळांनी सांगितली.

“स्वतंत्र पक्ष कोणीही काढू शकतं. पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल. पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यामध्ये यश मिळवणं, हे कितपत यशदायी आहे, याची मला कल्पना नाही. मग तो कुठलाही समाज असो”, असं छगन भुजबळ म्हणाले.

स्व. मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा

“आपल्यापुढे अशी कित्येक उदाहरणं आहेत. काही समाजाने, घटकाने वेगवेगळे पक्ष काढले, ते कितपत चालले, त्यांना कितपत यश मिळालं, याचा लेखाजोगा त्यांनी घ्यावा असा इशारा भुजबळांनी दिला. पण त्यांनी ( पंकजा मुंडे) त्याचा अभ्यास केला असेल. मात्र त्यांनी असं म्हटलं म्हणून त्या काही पक्ष काढतील, असं काही मला वाटत नाही. स्व. मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढाच अर्थ त्याचा आहे”, असं मला वाटतं, असं भुजबळांनी नमूद केलं.

नाशिक येथे आयोजित वारकरी भवनातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असे म्हटले होते. मात्र त्यांचे हेच वक्तव्य भाजपला सूचक इशारा दिला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यावर आधी संजय राऊत आणि आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे