
पावसाळी अधिवेशन चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन सुरु झालेला वादा अजूनही संपलेला नाही. माणिकराव कोकाटे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरुन हटवणार की त्यांना अभय मिळणार? अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माणिकराव कोकाटे वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते वादात सापडले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती.
माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याऐवजी त्यांना समज द्या, करावाई नको, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सूर आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याऐवजी खात बदललं जाऊ शकत अशी सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रात कृषी खातं हे महत्त्वाच मंत्रालय आहे. सध्या महराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्र्यांकडून संवेदनशील वक्तव्य, व्यवहाराची अपेक्षा असते. पण मागच्या काही काळात माणिकराव कोकाटेंच वर्तन या उलट दिसून आलं. त्यामुळे त्यांच्या बद्दलची नाराजी वाढली ते वादात सापडले.
‘हा विषय आता माझ्या हातात नाही’
अजितदादांसोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली होती. “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषिमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका,” अशी भूमिका या शिष्टमंडळाने मांडली होती. मात्र, यावर अजित पवारांनी ‘हा विषय आता माझ्या हातात नाही’ असं उत्तर दिलं. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे बोललं जात आहे. अजित पवारांनी कोकाटेंना बैठकीत चांगलच झापल्याची चर्चा आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं,” अशा शब्दांत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. “तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे. पण हा विषय आता पुढे गेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे,” असे सांगत अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.