अहमदनगर : 23 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांची साथ देण्याचे ठरवले. सत्तेत सामील झालेल्या अजितदादा गटातील मंत्री आणि आमदार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अशातच रोहित पवार यांच्यावर अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी टीका केली होती. तर, रोहित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजप आमदार यांनी आज एक राजकीय बॉम्ब फोडलाय.
अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याआधीच आमदार रोहित पवार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केला होता. तर, मंत्री छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जाण्याच्या पत्रावर सह्या केल्या होत्या असे सांगत रोहित पवार यांच्यावर टीका केली होती.
आमदार सुनील शेळके आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या या आरोपांचे वादळ शमते ण शमते तोच आता भाजप आमदार आणि त्याचे राजकीय विरोधक आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर सर्वात मोठ्ठा आणि गंभीर आरोप केलाय. यामुळे रोहित पवार यांच्यावर दिवसागणिक एकापाठोपाठ एक होणार्या आरोपामध्ये आणखी एका आरोपाची भर पडलीय.
रोहित पवार हे भाजपमध्ये जाणार होते या आमदार सुनील शेळके यांच्या आरोपांना भाजप आमदार राम शिंदे यांनी दुजोरा दिलाय. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले राजकीय तिकीट ब्लॅकमेल करूनच मिळवल्याची टीका आमदार राम शिंदे यांनी केली आहे.
2017 मध्ये रोहित पवार यांनी राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचे तिकीट देता की मी भाजपात जाऊ अशी धमकी दिली होती. तसेच, रोहित पवार यांनी 2019 ला हडपसर मतदारसंघासाठी भाजपकडे तिकीट मागितले होते असा आरोप राम शिंदे यांनी केला.
तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी रोहित पवार गेले होते, असे राम शिंदे म्हणाले. अजित पवार हे 30 वर्षापासून राजकारण करत आहेत. त्यामुळे ते नेते झाले, आपल्यात तेवढे मेरीट आणि क्षमता आहे का? हे ओळखून वक्तव्य करावं असा टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावलाय. तर, कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही असा खोचक सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिलाय.