
बीड (महेंद्रकुमार मुधोळकर) : मराठा आरक्षण आंदोलनाची धग राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचलीय. राजकीय नेत्यांना या आंदोलनाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. आधीच नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आलीय. काल मराठा आरक्षण आंदोलन हिंसक बनलं. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवण्यात आलं. त्यावेळी तिथे किती भीषण परिस्थिती होती, ते संदीप क्षीरसागर यांचे बंधु योगेश क्षीरसागर यांनी सांगितलं. घर, गाड्या जाळण हा पूर्वनियोजित कट होता, असं योगेश क्षीरसागर म्हणाले.
“कालचा हल्ला पूर्वनियोजित होता. बंगल्यासमोर चार प्रकारचा जमाव जमला होता. आग लावण्याआधी बंगल्याचा वीज पुरावठा कापण्यात आला. काही लोक घोषणा देत होते. मी खाली आलो, आम्ही गाड्या बाहेर काढल्या. पण पोलिसांनी आत पाठवलं” असं योगेश क्षीरसागर यांनी सांगितंल. “चार प्रकारचा जमाव बंगल्यासमोर जमला होता. घोषणा देणारा एक जमाव होता. दगडफेड करणारा, जाळपोळ करणार आणि हत्यारबंद असा चार प्रकारचा जमाव होता” असं योगेश क्षीरसागर म्हणाले.
‘त्यांना थांबवू नका, अशा सूचना कदाचित असतील’
“चार टोळ्या जमा झालेल्या. 1 हजारपेक्षा जास्त लोक समोर जमले होते. त्यामुळे इथे एवढा विद्धवंस घडला. शहरात 10 ते 12 ठिकाणी जाऊन हे उद्रेक माजवतात. त्यांना रोखणं हे पोलिसांसाठी मोठ काम नाही. पण त्यांना थांबवू नका, अशा सूचना कदाचित पोलिसांना देण्यात आल्या असतील” असं योगेश क्षीरसागर म्हणाले. “नेत्यांची अशी स्थिती असेल, तर सामन्य जनतेने जायचं कुठे? असा सवाल त्यांनी विचारला. काही ठिकाणी बसेस जाळल्या गेल्या. त्यात कोणाचे जीव गेले, नाही गेले हे बघाव लागेल. पण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात बीड जिल्ह्यातील पोलीस अपयशी ठरले” असं योगेश क्षीरसागर म्हणाले.