पंतप्रधान मोदी यांना भेटण्यात काहीच अडचण नाहीये; उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान कशाबद्दल?
Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या विषयावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी महायुतीवर टीका केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची सुद्धा तयारी दाखवली. त्यांनी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील तरुणांना कळकळीची एक विनंती केली.

मुंबई : “मराठा आरक्षणाच्या विषयासाठी पंतप्रधानांना भेटायला माझी काहीच अडचण नाही. मुख्यमंत्री असताना मी जे विषय मांडले, त्याची दखल घेतली नाही. आता मी बोलल्यावर ऐकत असतील, तर मी आता मोदींना भेटायला जायला तयार आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकत्र जातात. आरक्षणासाठी गेले का कधी? का गेले नाही? सर्व समाज अस्वस्थ आहे. धनगरही आतून धुमसत आहे. ओबीसी अस्वस्थ आहे. या समाजाचं रिकामं पोट भरण्याची जबाबदारी कोणाची आहे. महाराष्ट्रात आगी पेटवायच्या महाराष्ट्र बदनाम होईल येऊ घातलेले उद्योगधंदे त्यांच्या राज्यात नेले. महाराष्ट्राचं वातावरण बिघडवत आहेत” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
“प्रत्येकाची संयमाची सीमा असते. जरांगे पाटील यावर बोलले मी ऐकलं नाही. मी तरुणांना विनंती करतो आपसात दंगली भडकवणं योग्य नाही. मराठी माणसाचं नुकसान होत आहे. न्याय मिळत आहे, त्या दिशेने प्रयत्न करावे. महाष्ट्रातील केंद्राच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी मोदींसमोर विषय मांडावा. ते ऐकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्याावा. सत्तेतील खासदारांनी राजीनामे दिले. सत्तेत आहेत तर प्रश्न सोडवा. मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे. तुम्ही खासदार आहात ना जा संसदेत. आवाज उठवा. संसदेत का आवाज उठवत नाही” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. ‘टोकाच पाऊल उचलू नका’
उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली. “टोकाच पाऊल उचलू नका. तुमच्या सारख्या लढवय्यांची समाजाला, राज्याला गरज आहे” असं ते म्हणाले. “मराठा समाजातील तरुणांनी सुद्धा आत्महत्येसारख टोकाच पाऊल उचलू नये. आपसात मतभेद, जाळपोळ होईल असं करु नका” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
