Sunetra Pawar : सुनेत्रा पवार त्यांच्या दोन मुलांसह एका मोठ्या राजकीय रणनितीकाराला भेटल्या, कुठे झाली भेट? काय घडलं तिथे?

Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. राजकीय आव्हानं सुद्धा बरीच आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार एका विश्वासू राजकीय रणनितीकारला भेटल्या.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार त्यांच्या दोन मुलांसह एका मोठ्या राजकीय रणनितीकाराला भेटल्या, कुठे झाली भेट? काय घडलं तिथे?
sunetra pawar
| Updated on: Feb 14, 2026 | 10:45 AM

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे अचानक सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या, अजूनही घडतायत. अजितदादांच्या निधनानंतर तीनच दिवसात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्ममंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या त्या गटनेत्या आहेत. भविष्यात पक्षाला एकसंध ठेऊन तो पुढे घेऊन जाण्याचं त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. अजित पवारांच्या त्या संदर्भात शरद पवार पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका पार पडल्या होत्या, असे दावे केले जात आहेत.

याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार त्यांची दोन मुलं पार्थ आणि जय पवार यांच्यासह राजकीय रणनितीकार नरेश अरोरा यांना भेटल्या. नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स नावाची कंपनी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावण्याची या डिझाईन बॉक्सवर जबाबदारी आहे. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीत या डिझाईन बॉक्सनेच राष्ट्रवादीच्या प्रचार रणनितीची आखणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीला विधानसभेला जे यश मिळालं, त्यानंतर अजित पवार यांचा डिझाईन बॉक्सवरील विश्वास जास्त वाढला. नरेश अरोरा हे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार आहेत.

काय चर्चा झाली?

काल पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यात अजितदादांच्या पुण्यातील जिजाई बंगल्यात एकतास चर्चा झाली. त्यानंतर हे तिघे लगेच पुण्यातील सर्किट हाऊसवर जाऊन सुनेत्रा पवार यांना भेटले. तिथे चौघांमध्ये तासभर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यासह, राज्यात ज्या घडामोडी घडतायत त्यावर चर्चा झाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची सूत्र आली आहेत. राष्ट्रवादीची पुढील वाटचाल कशी असेल, यावर चर्चा झाली. नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार रद्द करण्याची अजित पवार चर्चा करत होते, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us