सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार? शरद पवारांचा धक्कादायक दावा

| Updated on: Apr 26, 2024 | 12:06 AM

'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत मोठा दावा केला आहे.

सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार? शरद पवारांचा धक्कादायक दावा
शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत मोठा दावा केला आहे. सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे तपास यंत्रणांच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत. पण त्यांच्यांवर आज ना उद्या कारवाई होऊ शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी आज भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन आजचं मरण उद्यावर ढकललं आहे, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले.

“आमचे काही सहकारी भाजपसोबत गेले, ते अनेक वर्ष पक्षाचे काम करत होते. आम्ही त्यांना अनेक पदं दिली. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केले होते. मी असं एकाचं नाव घेत नाही. पण काही लोकं होती. ते प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर मी मला शक्य नाही, मला योग्य वाटत नाही, असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मी त्यांना सांगत होतो की, मी हे करणार नाही आणि तुम्हीदेखील हे करणं योग्य नाही. मला अंदाज आहे की, जी फाईल टेबलवर जाईल ती मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ती फाईल कपाटात ठेवली जाईल. आता ती समजा नाही. उद्या त्यांना वाटेल तेव्हा ती फाईल कधीही काढली जाईल. त्यामुळे आजचं मरण उद्यावर गेलं, असं वाटलं तर त्यात काही चुकीचं नाही. त्यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी राहील, असं मला वाटतं”, असा मोठा दावा शरद पवारांनी केला.

‘माझे काही सहकारी अस्वस्थ होते’

“माझे काही सहकारी हे अस्वस्थ होते. त्यांना एजन्सीजचा त्रास होईल, असं वाटत होतं. ते आमच्याशी बोलत होते. त्यामुळे तिकडे जाणं म्हणजे वॉशिंगमशीन, कपडे टाकायचे आणि स्वच्छ करुन बाहेर निघतील, तशी संधी आपल्याला मिळेल, असं काही लोकांचं मत होतं”, असा खुलासा शरद पवारांनी केला. तसेच “सुप्रीम कोर्टात जावं लागेल. कोर्टाचा निकाल तर घ्यावा लागेल. राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या एका एजन्सीने चौकशी केली. या चौकशीत त्यांनी काही लोकांचं काही नाही, असा निष्कर्ष काढला”, असं शरद पवार म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वर्चस्वाच्या लढाईचा प्रश्न नव्हता. एजन्सीचे आमच्या काही सहकाऱ्यांसोबत चौकशीचे जे उद्योग सुरु होते, त्यामध्ये ते अस्वस्थ झाले. आमच्या काही सहकाऱ्यांच्या घरच्यांनी सांगितलं की, आम्हाला एकदाची गोळी घाला. यातून त्यांची अवस्था काय होती? हे स्पष्ट होते”, असं शरद पवार म्हणाले.