पुन्हा परीक्षा द्यायची नाही… NEET पेपरफुटीचा सर्वात मोठा झटका, एकाच वेळी 3 तरुणांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट (NEET) पेपरफुटीच्या मानसिक तणावातून लातूरमधील मैथिली सोनावणेसह गोवा आणि कलबुर्गी येथील ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी नैराश्यात होते.

देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET-UG) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. या पेपरफुटीचे धागेदोरे राजस्थानवरून आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आणि परीक्षा रद्द झाल्याचा प्रचंड मानसिक ताण आल्यामुळे देशात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपले आयुष्य संपवावे लागले आहे. लातूर, गोवा आणि कलबुर्गी (कर्नाटक) येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या 3 तरुण विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
लातूरमध्ये तरुणीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले
लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव (गोंद्री) येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीने नीट परीक्षा रद्द झाल्याच्या मानसिक तणावातून आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला स्कार्फने गळफास लावून आत्महत्या केली. मैथिली अशोक सोनावणे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
मैथिलीची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तिने यंदा १२ वी विज्ञान शाखेत ५१.५० टक्के गुण मिळवले होते. तिला डॉक्टर बनण्याची तीव्र इच्छा होती. तिने ३ मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. मात्र पेपरफुटीच्या वादामुळे ती परीक्षा रद्द झाली. २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार असल्याने ती प्रचंड नैराश्यात होती. शनिवारी १६ मे २०२६ रोजी सकाळी तिने टोकाचे पाऊल उचलले. मुरुड येथील सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गातेगाव पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. परीक्षा रद्द झाल्याने मुलगी तणावात होती, आमचा कोणावरही संशय नाही, असा जबाब तिच्या वडिलांनी नोंदवला.
‘पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यायची नाही’; सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याचा अंत
लातूरच्या घटनेपूर्वी गोव्यातील कुडतरी येथे एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या विद्यार्थ्याला नीटचा पेपर खूप चांगला गेला होता. मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याची बातमी समजताच तो तीव्र मानसिक दडपणाखाली आला. पोलिसांना घटनास्थळी त्याची सुसाईड नोट सापडली आहे. मला यापुढे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत बसायचे नाही, म्हणून मी माझे आयुष्य संपवत आहे, असे त्याने या नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली आहे.
कलबुर्गीत ९२% गुण मिळवणाऱ्या भाग्यश्रीची अपार्टमेंटमध्ये आत्महत्या
कर्नाटकातील कलबुर्गी येथेही एका १८ वर्षीय विद्यार्थिनी भाग्यश्री हिने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. भाग्यश्री अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने पीयूसी (१२ वी) परीक्षेत ९२% गुण मिळवले होते. २ मे रोजी तिने नीटची परीक्षा दिली होती. परंतु त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामुळे कोर्ट सर्कलजवळील स्वतःच्या अपार्टमेंटमध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतला. पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मात्र नीट परीक्षेचा ताण हेच यामागील कारण असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.