
नेपाळमध्ये सध्या यादवी सुरू आहे. इंटरनेट बंदीच्या विरोधात तरुणांनी उठाव केल्यानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही आपला राजीनामा द्यावा लागला आहे. जमावाने संसद पेटवली. पंतप्रधानांचं घर पेटवलं. एवढंच नाही तर हा उद्रेक इतका मोठा होता की माजी पंतप्रधानांच्या पत्नीला बेदम मारहाण करून जिवंत जाळण्यात आलं. यावरून नेपाळमधील जनता किती आक्रमक आणि हिंसक झालीय हे दिसून येत आहे. नेपाळमध्ये एवढी हिंसा का झाली? फक्त सोशल मीडिया बंद करण्यात आला हेच एक कारण आहे की यात बाहेरच्या शक्तीचाही हात आहे? या सर्व बाबींवर सध्या चर्चा झडत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या सर्व गोष्टींना अमेरिकेला जबाबदार धरलं आहे.
दक्षिण आशियात अमेरिकेचा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भारताचे शेजारी देश असलेल्या बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामागे अमेरिकेचा अदृश्य हात असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं असून त्यात हा दावा केला आहे. भारतीय उपखंडातील भू-राजकीय परिस्थिती नव्याने घडवण्याचा हा अमेरिकेचा सुनियोजित प्रयत्न आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
अमेरिकेची भूमिका महत्त्वाची
बांगलादेश, नेपाळ या दोन्ही देशांतील आंदोलने जरी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि लोकशाहीचा ऱ्हास यांसारख्या स्थानिक समस्यांमुळे सुरू झाली असली तरी, या आंदोलनांचा फायदा घेऊन मोठे राजकीय संकट निर्माण करण्यात अमेरिकेची भूमिका पूर्णपणे नाकारता येणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
बदलती समीकरणे
अमेरिकेने पाकिस्तानमधील चीनचा प्रभाव आधीच कमी केला आहे. आता आपण बांगलादेश आणि नेपाळमध्ये भारत समर्थक आणि चीन समर्थक सरकारे कोसळताना पाहत आहोत. भारताच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला बांगलादेशातून पायउतार व्हावे लागले. चीन समर्थक नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांना ‘जनरेशन झी’च्या नेतृत्वाखालील आंदोलनांमुळे राजीनामा द्यावा लागला आहे. या घटनांवरून असे दिसून येते की, अमेरिका दक्षिण आशियामध्ये एका मोठ्या भू-राजकीय रणनीतीचा भाग म्हणून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
भारत का पड़ोस — पहले बांग्लादेश और अब नेपाल — गंभीर अस्थिरता और राजनीतिक संकट का सामना कर रहा है।
हालांकि दोनों देशों में विरोध प्रदर्शन भ्रष्टाचार, बेरोजगारी और लोकतांत्रिक क्षरण जैसी वैध चिंताओं से उत्पन्न हुए, लेकिन इन आंदोलनों का लाभ उठाकर व्यापक राजनीतिक संकट को हवा देने… https://t.co/oK4CVeAWip
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 10, 2025
सीमेवर सुरक्षा
दरम्यान, नेपाळमधील परिस्थितीवरून भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नेपाळमधील भारतीय नागरिकांना आहे तिथेच राहण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावर उतरू नका. विनाकारण बाहेर पडू नका. तसेच स्वत:ची काळजी घ्या, असा सल्ला भारताने नेपाळमधील भारतीय नागरिकांना दिला आहे. तसेच भारत आणि नेपाळच्या सीमेवर सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.