
मोठी बातमी समोर येत आहे, पंढरपुरात सध्या कार्तिक वारीची जय्यत तयारी सुरू आहे. आषाढी वारीला विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो, तर कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र यावर्षीपासून आणखी एक नवी प्रथा सुरू होण्याची शक्यता आहे. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच यात्रा तयारीची आढावा बैठक पार पडली, या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो, तर कार्तिकी वारीच्या महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच जो प्रथम वारकरी असतो त्याला देखील या महापूजेचा मान मिळतो. मात्र आता वारकऱ्यासोबतच दोन जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील या महापूजेमध्ये सहभागी करून घेण्याचा विचार सुरू आहे, या संदर्भात यात्रा तयारीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन प्रथा यंदापासून सुरू करण्याची सूचना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. दरम्यान आता याबाबत मंदिर समिती आणि शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार महापूजा
दरम्यान यंदाची कार्तिक वारीची महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, या महापूजेत वारकऱ्याचा देखील सहभाग असतो, त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेतलं जाणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कार्तिक वारीसाठी 1150 जादा बस
आज शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कार्तिक यात्रा तयारी बैठक संपन्न झाली, यावेळी पंढरपूर, मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यभरातून तब्बल 1150 जादा बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे.