
देशभरात सरत्या वर्षाला निरोप देत २०२६ या नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रात अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. नव्या वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने व्हावी यासाठी अनेक भाविकांनी महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांमध्ये गर्दी केली आहे. तसेच शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर आणि शेगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी नयनरम्य सजावट करण्यात आली आहे. आळंदी येथील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांच्या वतीने सुमारे २ टन फुलांचा वापर करून मंदिराचा गाभारा, सोळखांबी आणि परिसर सजवण्यात आला आहे. ऑर्किड, गुलाब आणि झेंडू अशा १५ प्रकारच्या फुलांमुळे विठू माऊलीचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे. हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शिर्डीमध्ये काल मध्यरात्रीपासूनच साईनामाचा जयघोष ऐकू येत आहे. गेल्या २४ तासांत २ लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या चरणी माथा टेकवला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने रात्रभर दर्शन सुरू ठेवले होते. शिर्डीतील रस्ते, बाजारपेठा आणि मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांचा अलोट पूर आला आहे. सध्या देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून आलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने बीडकर पायऱ्यांवरून दर्शनाची विशेष सोय केली आहे. तर विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शेगाव संस्थानच्या वतीने रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात आले होते. शिस्तबद्ध दर्शन आणि भक्तीमय वातावरणामुळे शेगावमध्ये नवीन वर्षाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
दरम्यान या प्रमुख देवस्थानांसोबतच राज्यभरातील इतर स्थानिक मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच ठिकाणी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन, नवीन वर्षात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना भाविक देवाच्या चरणी करताना दिसत आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात २०२६ या नववर्षाचे स्वागत केले जात आहे.