
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांंचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा गटनेता कोण होणार? नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा सुरू झाली होती, अखेर याचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार या आज सांयकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थिती होते, या बैठकीमध्ये एकमतानं सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठीकमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले होते.
पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यासंदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षातील सर्व निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. दोन्ही प्रस्ताव या बैठीकत मंजूर करण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं होतं. आपल्याला या शपथविधीबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं, तसेच या संदर्भात आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी 12 तारखेला एकत्र येणार होते, असा दावाही शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला होता.
दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यामुळे तसचे पक्षासंदर्भात सर्व निर्णय घेण्याचे अधिकारही त्यांनाच प्राप्त झाल्यामुळे आता सुनेत्रा पवार याच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात अधिकृत निर्णय घेऊ शकतात, त्यांनाच तो अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.