OBC Reservation : आंतर जातीय विवाहात OBC आरक्षण मिळेल का? बबनराव तायवाडे यांनी काय उत्तर दिलं?

OBC Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या सहा दिवसांच्या आंदोलनाची काल सांगता झाली. राज्य सरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या. यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मुख्य मागणी होती. मराठा-कुणबी एकच आहेत, त्यामुळे मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा अशी जरांगे पाटील यांची मुख्य मागणी होती.

OBC Reservation : आंतर जातीय विवाहात OBC आरक्षण मिळेल का? बबनराव तायवाडे यांनी काय उत्तर दिलं?
OBC leader Babanrao Taywade
| Updated on: Sep 03, 2025 | 10:21 PM

“काल शासनाने जो निर्णय काढलेला आहे आणि उपोषणकर्त्यांना दिला. त्यामुळे त्यांचं समाधान झालं. त्यांनी उपोषण मागे घेतलं. हा शासन निर्णय जेव्हा आमच्या हाती पडला, तेव्हा आम्ही आमच्या राष्ट्रीय ओबीसी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि तज्ज्ञांसोबत प्रदीर्घ चर्चा केली” असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले. “नातेसंबंधातील व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास वडिलोपार्जित पद्धतीने कोणाकडे कुणब्याच प्रमाणपत्र असेल, तर दावा करणारा व्यक्ती नातेसंबंधातील, कुळातील असल्याच नातेवाईकाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल की हा व्यक्ती आमच्या कुळातील आहे” असं बबनराव तायवाडे म्हणाले.

नातेसंबंध उल्लेख आहे त्यावरुन संभ्रम आहे. काहीजण आक्षेप नोंदवतायत. आंतरजीतय विवाह झाला, तर माझे सासू-सासरे असं नात जोडता येईल का? या प्रश्नावर सुद्धा बबनराव तायवाडे यांनी उत्तर दिलं. “जातीचा दाखला काढणं आणि त्याची वैधता तपासणी या दोन बाबतीत नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित नातेवाईकाकडून पितृसत्ताक पद्धतीमध्ये जे नातेवाईक येतात तेच नातेवाईक. हा जनरल जीआर नाही. शासन निर्णय आहे तो जातप्रमाणपत्र किंवा जातीची वैधता तपासण्याकरता आहे. 2000 साली, 2012 मध्ये आणि 2024 मध्ये अधिनियम निघाला आहे. त्यात प्रत्येक ठिकाणी वडिलोपार्जित म्हटलय. वडिल, पणजोबा, खापर पणजोबा यात तुम्ही बसत असाल तरच” असं बबनराव तायवाडे म्हणाले.

मातृसत्ताक पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळेल का?

तम्ही समाधानी आहात का? या प्रश्नावर बबनराव तायवाडे म्हणाले की, “आम्ही समाधानी आहोत. ओबीसी समाजाचं इथे कुठेही नुकसान झालेलं नाही. जी प्रचलित पद्धत आहे. त्याच पद्धतीत जाऊन जातप्रमाण पत्र घ्यावं लागणार आहे” “मी याआधी सुद्धा बोललोय की, वडिल, पणजोबा, खापरपणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रांमध्ये कुणबी- मराठा अशी नोंद असेल किंवा वंशावळीचे जे काही नातेसंबंध आहेत. कुणाकडे जातीच प्रमाणपत्र असेल. वंशावळीत नातेसंबंधात कुणाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अर्ज करु शकता. मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही” असं बबनराव तायवाडे म्हणाले.

‘गरज पडली तर न्यायालयात जाऊ’

हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर मराठवाड्यात मोठ्या संख्येने मराठ्यांचा ओबीसी कुणबीत समावेश होईल, याची भिती वाटते का? “बघा, 60 टक्के ओबीसी समाज आहे. जेवढे नेते तेवढ्या व्यक्ती. प्रत्येकाचा वेगवेगळा अभ्यास असू शकतो, शंका-कुशंका असू शकतात. आतापर्यंत जो अभ्यास केलाय त्यावरुन निष्कर्ष काढलाय की कुठलही नकुसान झालेलं नाही. आजही दिवसभर विविध कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहोत. आमचं उपोषण सुरुच राहणार आहे. गरज पडली तर न्यायालयात जाऊन दाद मागू” असं बबनराव तायवाडे म्हणाले.