मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणासाठी उरला नाही, तर…; लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा, ओबीसींनाही दिला महत्वाचा इशारा

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केला आहे. आता त्यांची लढाई आरक्षणासाठी राहिली नसून राजकीय झाली आहे, अशा शब्दात हाके यांनी टीका केली.

मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणासाठी उरला नाही, तर...; लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा, ओबीसींनाही दिला महत्वाचा इशारा
| Updated on: Aug 10, 2026 | 1:28 PM

सातारा: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. या पार्श्वभूमीवरील त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा हा समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच शासनाने एका आंदोलनासमोर झुकून संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आणल्याची टीकाही त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांची ही लढाई केवळ शिक्षण, नोकऱ्या किंवा आरक्षणासाठी उरलेली नाही. तर राजकीय लोकांची गणिते चुकली आहेत, त्यांच्या तालावर नाचणारा हा प्रकार आहे. मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर ओबीसींमध्ये समावेश केल्यामुळे मूळ ओबीसी, भटक्या-विमुक्त जमाती बलुतेदार-अलुतेदार आणि अठरा पगड जातीतील घटकांचे आरक्षण संपुष्टात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यांमध्ये ओबीसी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. सर्व ओबीसी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “तुमचे आरक्षण संपत चालले असून पुढील पिढ्यांच्या राजकीय व सामाजिक अधिकारांवर गदा येत आहे. जर आता आपण जागे झालो नाही, तर भविष्यात पुन्हा गुलामी सहन करावी लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील हे रोज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांवर टोकाची टीका करतात, तरीही शासन किंवा राजकीय नेते कोणतीही भूमिका घेत नाहीत. परंतु एखाद्या वंचित किंवा ओबीसी घटकातील व्यक्तीने प्रश्न विचारला तर त्याला राजकीय किंवा वैयक्तिक ठरवले जाते. लोकशाहीत सर्वांना समान मतदानाचा अधिकार असताना सरकार एका बाजूला झुकून हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अनेक ठिकाणी फेरफार करून, जुन्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून आणि बोगस कुणबी दाखले मिळवून मागासवर्गीयांच्या हक्कांवर डल्ला मारला जात आहे. माहितीच्या अधिकारात विचारलेली माहिती देण्यासही प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्ही मेंढपाळाची मुले आहोत आणि अठरा पगड जातीतील बांधवांना सोबत घेऊन या अन्यायाविरुद्ध जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ, असा ठाम निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us