Hingoli Incident : औंढा नागनाथ मंदिरातील गेट कोसळला, दहा वर्षाच्या बालकाचा दबून मृत्यू

| Updated on: Jul 25, 2023 | 12:59 PM

घरची परिस्थिती बेताची असल्याने दहा वर्षाचा चिमुकला औंढा नागनाथ मंदिरात गंध लावण्याचे काम करायचा. नेहमीप्रमाणे तो आज सकाळी मंदिरात गेला, पण पुन्हा घरी परतलाच नाही.

Hingoli Incident : औंढा नागनाथ मंदिरातील गेट कोसळला, दहा वर्षाच्या बालकाचा दबून मृत्यू
मंदिराचा गेट अंगावर कोसळून मुलाचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

हिंगोली / 25 जुलै 2023 : औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंग एक असलेल्या मंदिराच्या पूर्व दिशेला मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी लावण्यात आलेला लोखंडी गेट कोसळल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. या गेटखाली दबून दहा वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बालकाचा मृतेदह रुग्णालयात पाठवण्यात आला. पीडित मुलगा नागनाथ मंदिर परिसरात गंध लावण्याचे काम करुन उदरनिर्वाह करत होता. औंढा नागनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. यामुळे येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. आज घडलेल्या घटनेमुळे भाविकांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंदिरात गंध लावण्याचे काम करत होता चिमुकला

पीडित कुटुंब मूळचे लातूरचे असून, गेली अनेक वर्षे कामानिमित्त औंढा नागनाथ येथे राहतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि आई-वडिलांना काम करणे जमत नसल्याने मयत मुलगा सकाळी मंदिर परिसरात गंध लावण्याचे काम करुन पैसे कमवायचा. या पैशाने कुटुंबाला हातभार लावत होता. मंदिरात काम करुन तो शाळेत जायचा. तो नेहमीप्रमाणे आज सकाळी मंदिरात गंध लावण्याचे काम करण्यासाठी गेला.

मंदिर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना

सकाळी 7 वाजता मंदिरातून बाहेर पडत असतानाच नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला असलेला गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा गेट तारेने बांधलेला होता. मुलाचा त्याला धक्का लागल्याने गेट अंगावर पडला आणि ही दुर्घटना घडली. मंदिर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. आता चौकशी करून दोषींवर काय कावाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा