भाजपमध्ये जाणार अशी ज्यांच्या नावाची चर्चा होती, तेच म्हणतात, राज्यात चौथं सरकार कधीही येईल; कुणी केला हा दावा?

देशमुख यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच मौन सोडत हे विधान केलं. त्यामुळे देशमुख भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपमध्ये जाणार अशी ज्यांच्या नावाची चर्चा होती, तेच म्हणतात, राज्यात चौथं सरकार कधीही येईल; कुणी केला हा दावा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 13, 2023 | 9:55 AM

सांगली: काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख हे भाजपमध्ये जाण्याच्या जोरदार चर्चा होत्या. भाजपकडूनही या चर्चांना हवा दिली जात होती. त्यामुळे अमित देशमुख हे भाजपच्या गळाला लागणार असल्याचे कयास बांधले जात होते. मात्र, अमित देशमुख यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपमध्ये जाणार नाही. काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, हे सांगतानाच राज्यात सध्या पाच वर्षातील तिसरं सरकार सुरू आहे. आता चौथं सरकार कधीही येऊ शकेल, असं भाकीतच अमित देशमुख यांनी केलं आहे. अमित देशमुख यांच्या या दाव्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ज्या नेत्याच्या भाजपमध्ये येण्याच्या वावड्या उठवल्या गेल्या त्याच्याच विधानाने भाजपच्या तंबूत खळबळही उडाली आहे.

सांगली येथे एका सभेला संबोधित करताना अमित देशमुख यांनी हा दावा केला आहे. सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. तसे तूर्त तरी म्हणावे लागतेय, असा चिमटा काढतानाच हे सरकार वैध की अवैध हे सर्वोच्च न्यायालयात ठरेल. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे आणि आता कोर्ट सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखा, असंही अमित देशमुख यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

त्यानंतर देशमुख यांनी पुढचा बाऊन्सर टाकला. आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली आहेत. सध्या राज्यात तिसरे सरकार सुरू आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते.

दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे तर तिसरे सरकार हे सध्या सुरू आहे. आता चौथे सरकार कधीही येऊ शकेल. त्याबाबत काहीही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे, असा दावाही त्यांनी केला.

लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली आणि कितीही संकटे आली तरी आहे तिथेच राहणार आहे. मला बोलवणाऱ्यांनी स्वतः स्वगृही (काँग्रेसमध्ये) यावं, असं आवाहन त्यांनी भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेस नेत्यांना केलं.

देशमुख यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच मौन सोडत हे विधान केलं. त्यामुळे देशमुख भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, आता लातूरमधील कोणता नेता भाजपमध्ये जाणार याविषयीचे कुतुहूल निर्माण झाले आहे.

दरम्यान, अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर दिली गेल्याची चर्चा आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. अमित देशमुख यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली जाते. यावरून भाजप पक्ष सामर्थ्यवान नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.