डॅशिंग अधिकारी आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी, नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण

| Updated on: Aug 03, 2021 | 3:18 PM

परभणी जिल्ह्यातील सत्तारुढ पक्षाच्या काही नेते मंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावली. थेट मंत्रालयात धाव घेत आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.

डॅशिंग अधिकारी आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी, नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण
परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयलच. नवाब मलिक यांची माहिती
Follow us on

मुंबई : डॅशिंग आयएएस अधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal) परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील, असं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी स्पष्ट केलं. रुजू होण्याच आधीच गोयल यांची बदली अचानक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे परभणीत काही संघटनांनी आंदोलनही छेडलं. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेताना नवाब मलिक यांनी आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील, असं जाहीर केलं.

गोयल यांची बदली अचानक रद्द

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आयएएस अधिकारी आंचल गोयल या जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार होत्या. त्यांचा फोटोही सर्व वर्तमानपत्रात झळकला. त्या चार दिवस अगोदर परभणीला आल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या. मात्र रुजू होण्याच आधी ऐनवेळी गोयल यांची बदली अचानक रद्द करण्यात आली.

अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार देण्यात यावा, अशा आदेशाचे पत्र शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंत्रालयातून आले. त्यानंतर काटकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. आंचल गोयल या डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या, अशी चर्चा जिल्हाभरात रंगली होती.

नेमकं काय घडलं?

परभणी जिल्ह्यातील सत्तारुढ पक्षाच्या काही नेते मंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावली. थेट मंत्रालयात धाव घेत आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर आंचल गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार द्यावा, असे आदेश शनिवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले. मुगळीकर यांनी आपला पदभार राजेश काटकर यांच्याकडे सोपवून निवृत्ती घेतली.

‘आंचल गोयल यांना पदभार देण्यात यावा’

आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारावा म्हणून परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आंदोलन छेडले होते. “आंचल गोयल यांना का रुजू करून घेतले नाही? त्या रुजू झाल्या तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? हे सर्वसामान्य जनतेला कळालेच पाहिजे. एक महिला, आयएएस आधिकारी तिचे सात-आठ महिन्याचे बाळ घेऊन पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षीय नेते मंडळी साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ती महिला पदभार कसा घेणार नाही, यासाठी वरिष्ठ स्तरावरुन डावपेच करतात. ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. आंचाल गोयल यांना पदभार देण्यात यावा” अशी मागणी आंदोलकांनी केली.

संबंधित बातम्या :

आम्हाला डॅशिंग अधिकारी आंचल गोयल याच जिल्हाधिकारी हव्यात, परभणीकरांचं आंदोलन, सरकार दखल घेणार?

पदभार स्वीकारण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच परभणीत, डॅशिंग अधिकारी आंचल गोयल यांची ऐनवेळी बदली रद्द

राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप