आई आणि बहीण शेतात कामासाठी गेली होती, घरी न परतल्याने शेतात गेल्यावर धक्काच बसला

| Updated on: Jul 03, 2023 | 3:03 PM

उसाच्या शेताच्या बांधावर विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडली होती. ती न दिसल्याने या तारेला माधुरी हिचा स्पर्श झाला. शॉक लागून तार गळ्याभोवती अडकली. हे पाहून आईने तिला सोडवण्यासाठी प्रयत्न केला.

आई आणि बहीण शेतात कामासाठी गेली होती, घरी न परतल्याने शेतात गेल्यावर धक्काच बसला
Follow us on

सांगली : वंदना माळी या मुलीसोबत दुपारी कुरळप वशी हद्दीवरील शेतात टोकण करण्यासाठी गेल्या होत्या. टोकन करून सायंकाळी परत येत होत्या. तेवढ्यात उसाच्या शेताच्या बांधावर विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडली होती. ती न दिसल्याने या तारेला माधुरी हिचा स्पर्श झाला. शॉक लागून तार गळ्याभोवती अडकली. हे पाहून आईने तिला सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तिलाही शॉक लागला. यामध्ये दोघींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत एका कुत्र्याचा ही शॉक लागून मृत्यू झाला.

हातात काठी असल्याने तो बचावला

शेतात काम करण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या. त्यांचा विद्युत तारेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप या गावात ही घटना घडली. वंदना विश्वास माळी (वय 45 वर्षे) आणि माधुरी विश्वास माळी (वय 20 वर्षे) असे मृतकांची नावं आहेत. आई आणि बहीण अजून का घरी आली नाही म्हणून मुलगा संजीव माळी त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला. त्याला ही हाताला शॉक लागला. मात्र हातात लाकडी काठी असल्याने तो बचावला.

माधुरी घेत होती बीएचे शिक्षण

वंदना विश्वास माळी यांचे पती विश्वास माळी यांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाले. मुलगी आणि दोन मुलांसोबत शेतातील घरी राहत होते. माधुरी ही BA चे शिक्षण घेत होती. आईला मदत म्हणून ती आईसोबत टोकण करण्यासाठी शेतात गेली होती. मात्र विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांच्या हालगर्जी आणि निष्काळजी कामामुळे त्यांना नाहक जीव गमवावा लागला.

नागरिकांमध्ये संताप

सध्या वंदना यांच्यामागे संजीव आणि सुरेश ही दोन मुले आहेत. आई आणि बहिणीच्या निधनाने दोन भावांचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. ही दुर्देवी घटना घडूनही रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते.

यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. शेतात असणाऱ्या विद्युत पोलच्या तारांना ठिकठिकाणी जोड आहेत. अनेक वेळा स्पार्क होऊन तारा तुटलेल्या आहेत. त्याच तारांना जॉईन्ड करून काम सुरू होते. पावसाळ्याच्या अगोदर योग्य काम झाले असते तर मायलेकींना आपला जीव गमवावा लागला नसता.