धाराशिवमध्ये डायलिसिस सेंटर पुन्हा सुरू; ४४ रुग्णांना मोठा दिलासा, टीव्ही 9 मराठीचा इम्पॅक्ट!
Dharashiv Dialysis Centre: धाराशिव जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीव्ही 9 मराठीने हा गंभीर प्रश्न समोर आणताच आरोग्य विभागाने दखल घेतली असून, डायलिसिस उपचार पुन्हा सुरळीत करण्यात आले आहेत.

Dharashiv Dialysis Centre: धाराशिव जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांसाठी दिलासादायक बातमी. साहित्य पुरवठादाराची दोन वर्षांपासूनची बिले थकीत असल्याने बंद पडलेली मुरूम, लोहारा, सास्तूर आणि वाशी येथील डायलिसिस सेंटर अखेर आरोग्य विभागाने पुन्हा सुरू केली आहेत. टीव्ही 9 मराठीने हा गंभीर प्रश्न समोर आणताच आरोग्य विभागाने दखल घेतली असून, डायलिसिस उपचार पुन्हा सुरळीत करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या ४४ गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्णांना मोठा दिलासा
मुरूम येथील १०, लोहारा येथील ८, सास्तूर येथील १६, तर वाशी येथील १० अशा एकूण ४४ रुग्णांचे उपचार थकीत बिलांमुळे बंद पडले होते. या प्रश्नावर काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. अखेर टीव्ही 9 मराठीने बातमीच्या माध्यमातून हा प्रश्न प्रशासनासमोर आणला आणि आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत ही केंद्र पुन्हा सुरू केली आहेत. रुग्णांना आता पुन्हा नियमित उपचार घेता येणार आहेत.
दोन वर्षांपासून बिल थकीत
जिल्ह्यातील गरीब आणि गरजू किडनी विकाराने त्रस्त रुग्णांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. साहित्य पुरवठादाराची दोन वर्षांपासूनची बिलं थकीत होती. मुरूम ग्रामीण रुग्णालयातील महा डायलिसिस सेंटरची सेवा या ११ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली होती. यामुळे मुरूम, सास्तूर, लोहारा आणि वाशीमधील ४४ रुग्णांच्या उपचारांचा प्रश्न निर्माण झाला होता. या रुग्णांना उपचारासाठी तुळजापूर अथवा धाराशिव येथे दोन तासांचा प्रवास करावा लागण्याची वेळ आली होती. यामुळे नातेवाईकांची गैरसोय होण्याची शक्यता होता.
दरम्यान जिल्हा काँग्रेस सचिव सिद्धलिंग अप्पा हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश अर्दाळे यांना निवेदन देऊन डायलिसिस सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच मागणीवर विचार न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्हा यंत्रणा लागलीच हालली. मुरूम, लोहारा, सास्तूर आणि वाशी येथील डायलिसिस सेंटर अखेर आरोग्य विभागाने पुन्हा सुरू केली आहेत.