पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला, सर्वसामान्यांचं काय? संजय शिरसाट पोलिसांवर भडकले, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
घरावर हल्ला झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट पोलिसांवर चांगलेच भडकले. शिरसाट यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री तिघांनी हल्ला केला. मद्यधुंद तरुणांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळतेय. तिघांनी हल्ला केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी थेट पोलीस महासंचालकांना फोन केला. परंतु दुसरीकडे जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांनी, पोलीस उपआयुक्तांनी फोन उचलला नाही. शहरातील गुन्हेगारी पोलीस आयुक्त गांभीर्याने घेत नाहीत. मी निश्चित याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करेल, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला झाला. त्यानंतर मंत्री शिरसाट म्हणाले, तिघांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिघे मद्यधुंद अवस्थेत होते, त्यांची गाडी पडली. हे सगळं सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. ते वापस गेले, वापस आले. माझ्या गेटजवळ आले. माझ्या गार्डने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते बोलले की, अनेक ओएसडी माझ्या खिशात आहेत, माझं कोणी काही करू शकत नाहीत. संजय शिरसाट सोडून द्या, पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? मी अनेक वेळा पोलीस कमिशनरला सांगितलं, तुम्ही कुठेतरी कायदा व सुव्यवस्था पाहा. या शहरात दिवसाढवळ्या ड्रग विकल्या जात, खून होतो. पोलीस कमिशनर गांभीर्याने घेत नाहीत. मी निश्चित याची तक्रार मुख्यमंत्री फडणवीसांकडे करेल. साधा डीसीपी, सीपी नाहीच नाही. आता किमान येऊन पाहणी केली पाहिजे. मी पोलीस महासंचालकांचं आभार मानेल. पोलीस महासंचालकांनी रात्री बारा वाजता माझा फोन घेतला. त्यांनी मला सांगितलं शिरसाट साहेब काळजी करू नका. मी सगळी चौकशी करतो’.
‘महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक फोन उचलू शकतात. आमच्या पोलीस आयुक्तांचा फोन बंद आहे. आमचे पोलीस उपायुक्त झोपलेले आहेत. सहायक पोलीस आयुक्त कुठे आहेत माहित नाहीत. कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असेल, तर या शहरासाठी चांगलं नाही. हे मी माझ्यावर हल्ला झाला म्हणून बोलतो अशातला भाग नाही. अनेक वेळेस मी सुद्धा पोलीस आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आज माझ्यासोबत घडलं. मी आता लोकांना काय सांगू, हल्ल्याला मी घाबरत नाही. परंतु सर्वसामान्यांचा जीव सुद्धा धोक्यात आहे, हे याच्याहून दिसतं, असे शिरसाट यांनी सांगितले.
‘जर पालकमंत्र्यांची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय? हा प्रश्न उपस्थित होईलच. सर्वसामान्य लोक बोलणार नाहीत का, आम्हाला काय सांगता… तुम्ही सुरक्षित नाही, तर आमचं काय? ही शहरासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तातडीने पोलीस आयुक्ताला येथून हलवलं पाहिजे. कायदा संस्थेचे भान आपण सर्वांनी राखलं पाहिजे. पोलीस आयुक्तांची बदली झालीच पाहिजे. त्यांचा कालावधी पूर्ण झालाय. जिल्ह्यात ड्रग विक्री होते. दिवसाढवळ्या हत्या होतात. मी ठामपणे सांगेल, त्याला तातडीने काढा. हे शहर शांततेत असले पाहिजे. वसुलीसाठी हे शहर नाही, मला वाटतं, मुख्यमंत्री याची गांभीर्याने दखल घेतील, असे त्यांनी पुढे सांगितले.
