भरधाव ट्रकची वडापला जोरदार धडक, 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी

दापोलीहून प्रवाशांनी भरलेली वडाप हर्णैच्या दिशेने चालली होती. पण आसूदजवळ घात झाला आणि आठ जणांना आपला जीव गमवावा लागला.

भरधाव ट्रकची वडापला जोरदार धडक, 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी
दापोलीत रिक्षा अपघातात 8 जणांचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 26, 2023 | 2:03 PM

दापोली : भरधाव ट्रकने प्रवासी वडापला धडक दिल्याने अपघातात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीतील दापोली तालुक्यात घडली. यात अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. दापोली ते हर्णै दरम्यान आसूद जोशी आळी येथे काल दुपारी 3.30 सुमारास हा भीषण अपघात घडला. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना दोपाली उपडिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. नंतर मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झला आहे. अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमीचा खर्च देखील सरकार करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने वडापला धडक दिली

मिळालेल्या माहितीनुसार, वडापमध्ये एकूण 14-15 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी दापोलीकडे जाणाऱ्या ट्रकने हर्णेकडे जाणाऱ्या वडापला धडक दिली. या दुर्दैवी घटनेत 2 अल्पवयीन मुली आणि रिक्षा चालकासह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनिल सारंग असे या रिक्षाचालकाचे नाव असून, तो हर्णे गावचा रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.