पर्यटकांना रुम भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा निर्णय

| Updated on: Jul 01, 2021 | 5:04 PM

गणपतीपुळ्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रूम भाड्यानं दिल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल, असं पत्रक गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं काढलं आहे.

पर्यटकांना रुम भाड्याने दिल्यास 10 हजारांचा दंड, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा निर्णय
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळेला कोरोनामुळे मोठा फटका बसतोय. गावात कोरोना रुग्ण संख्या कमी होतेय. पण ही रुग्ण संख्या वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीनं अजब फतवा काढलाय. गणपतीपुळ्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रूम भाड्यानं दिल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल, असं पत्रक गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं काढलं आहे. काय आहे हा प्रकार पाहूया एक रिपोर्ट.

देशातील महत्त्वाचं ड्रेस्टिनेशन म्हणजे गणपतीपुळे. समुद्र आणि गणपतीमंदिर यामुळे इथं पर्यटक खिळून रहातो. पण या गावात कोरोनाच्या भितीने सध्या ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय चर्चेचा विषय ठरलाय. कारण बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रूम भाड्यानं दिल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाईल, असं पत्रक गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं काढलं आहे. गावातील रुग्ण संख्या कमी आहे. बाहेरून पर्यटक आले, तर रुग्ण संख्या वाढेल. त्यामुळे ग्रामस्थांच्या काळजीने हा निर्णय घेतल्याची माहिती गणपतीपुळेचे उपसरपंच महेश केदार यांनी दिलीय.

दीड वर्ष व्यवसाय बंद, व्यवसायिकांमध्ये नाराजीचा सूर

या निर्णयाने काही प्रमाणात इथले व्यवसायिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. गेले दीड वर्ष इथले व्यवसाय बंद आहेत. गावासाठी म्हणून ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र व्यवसाय सुरु करण्यासाठी इथं येणाऱ्या पर्यटकांचे टेस्टिंग करून किंवा वेगळी नियमावली करून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक व्यवसायिकांनी केलीय.

फतव्यामुळे अनेक पर्यटकांना लॉज मिळणं कठिण

सध्या महाराष्ट्रात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटक गणपतीपुळ्यात दाखल होतायत. अशावेळी त्यांच्याकडून स्वाभाविकपणे राहण्यासाठी हॉटेलचा आसरा घेतला जातो. काही पर्यटक रात्री उशिरा देखील येतात. पण या फतव्यामुळे अनेक पर्यटकांना इथं लॉज मिळणं कठिण झालंय. अनेक ठिकाणी विचारून लॉज मिळत नसल्याने पर्यटक माघारी किंवा रत्नागिरीत जातायत.

कोरोना संकटामुळे पर्यटनाला जबर फटका बसलाय. गावात येणाऱ्या पर्यटकांना दूर ठेवून ग्रामपंचायत कोरोनापासून वाचण्याचा प्रयत्न करतेय. पण या निर्णयानं ग्रामपंचायत अधिक चर्चेत आलीय.

हेही वाचा :

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर धुक्यामध्ये हरवले, पर्यटकांचा मात्र हिरमोड

Taj Mahal: दोन महिन्यांनंतर पर्यटकांसाठी ताजमहल सुरू, पाहा काय आहेत नवे नियम

PHOTO | तुफान पाऊस, फेसाळलेले पाणी, साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याचे विलोभनीय फोटो

व्हिडीओ पाहा :

Ganpatipule Grampanchayat ban Hotel rooms for tourist amid corona