डोळा मारणे सुरूच… अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटील म्हणाले, लग्न व्हायचं असेल तर…

| Updated on: Apr 16, 2023 | 8:53 AM

विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. पाटील यांच्या विधानाने एकच चर्चा रंगली आहे.

डोळा मारणे सुरूच... अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटील म्हणाले, लग्न व्हायचं असेल तर...
gulabrao patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अजित पवार यांची राजकीय विधाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणं आणि त्यांचं अचानक नॉट रिचेबल होणं या सर्व विधानातून अजितदादा पवार हे भाजपला डोळा मारत असल्याचं सांगितलं जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही अजित पवार यांना डोळा मारला आहे. अजित पवार भाजप आणि शिवसेना युतीसोबत येणार असल्याचं अप्रत्यक्ष विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

गुलाबराव पाटील हे जळगावात आले होते. यावेळी त्यांच्याशी मीडियाने संवाद साधला. बरेच आमदार त्यांच्या सोबत आहेत. बघूया. कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे. आणि तिथी लवकरच येणार आहे. अजून तरी कूळ बघावे लागेल, गुण जुळावे लागतील त्यानंतर ते काम करावे लागेल, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर गुलाबराव पाटील यांनी हसत उत्तर दिलं. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे सध्या. आकडा ते म्हणतील तोच आकडा होईल, असंही त्यांनी म्हणून खळबळ उडवून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार भाजपसोबत जाणार?

गेल्या आठवड्यात अजित पवार हे नॉट रिचेबल होते. त्यांचा फोन लागत नव्हता. पुण्यातील कार्यक्रम रद्द करून ते अचानक गायब झाले होते. त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यानंतर दोन दिवसाने अजित पवार एका ज्वेलरी शोरुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यांनी या कार्यक्रमाला सपत्नीक हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवादही साधला होता. पित्त झाल्याने आपण डॉक्टरांकडे गेलो होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होतो. त्यामुळे मोबाईल नॉट रिचेबल होता, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

पुन्हा चर्चा

ही चर्चा थांबते ना थांबते तोच पुन्हा अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याला निमित्ता होत्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया. दमानिया यांनी ट्विट केल्याने पुन्हा चर्चा रंगल्या होत्या. मी मंत्रालयात गेले होते. तिथे काही पत्रकार भेटले. काही लोकांना भेटले. त्या प्रत्येकांनी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं सांगितलं.

शिंदे गटाचे 15 आमदार बाद झाल्यास अजित पवार भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थिर करतील, असं या पत्रकारांचं म्हणणं होतं. शिवाय अजित पवार यांचे गेल्या काही दिवसातील विधाने पाहता भाजपसोबत जाणार असल्याचं दिसत आहे, असं दमानिया यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.