VIDEO: कोण म्हणालं माझे वडील गायब आहे, तर कोण म्हणालं माझी आई… तळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश

| Updated on: Jul 24, 2021 | 4:08 PM

'साहेब, गेल्या दोन दिवसांपासून माझे वडील गायब आहेत... शोध शोध शोधलं पण सापडत नाहीत... मी खूप लांबून आलोय... काही तरी करा...' असा टाहोच तळीये दुर्घटनाग्रस्तांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर फोडला. (CM Uddhav Thackeray)

VIDEO: कोण म्हणालं माझे वडील गायब आहे, तर कोण म्हणालं माझी आई... तळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश
फाईल फोटो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

महाड: ‘साहेब, गेल्या दोन दिवसांपासून माझे वडील गायब आहेत… शोध शोध शोधलं पण सापडत नाहीत… मी खूप लांबून आलोय… काही तरी करा…’ असा टाहोच तळीये दुर्घटनाग्रस्तांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर फोडला. कुणी सांगितलं माझे वडील गायब आहेत. कुणी आई गायब असल्याचं सांगितलं. तर, कुणी आमचं अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं. तसेच राज्य सरकार तुमच्या पाठिशी उभं आहे, असं आश्वासनही या ग्रामस्थांना दिलं. (Maharashtra rains: CM Uddhav Thackeray assures of full support to taliye village people)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये येथे येऊन दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस केली. त्यांचं सांत्वन केलं. यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. या दुर्घटनेत काही लोक वाचले. ते कामाला गेले होते म्हणून वाचले. तर अजूनही 26-27 जण बेपत्ता आहेत. माझे वडील गायब आहे. मी खूप लांबून आलोय. एक जण तर हिमाचल प्रदेशातून आला आहे, असं एका तरुणाने मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तर, दुसऱ्या तरुणाने त्याची आई गायब असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. तसेच शेजारच्या गावातील लोकांनी खूप मदत केल्याचंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

आमचं पुनर्वसन करा, आमचा तुमच्यावर विश्वास

या दुर्घटनेनंतर लगेचच शासकीय यंत्रणा घटनास्थळी येईल अशी अपेक्षा होती. रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टर येईल असं वाटत होतं. पण कोणीच आलं नाही. आता आम्हाला लवकरात लवकर दिलासा द्या. आमचं पुनर्वसन करा. आमचा सरकारवर पूर्णपणे विश्वास आहे, असं सांगतानाच कोकणात जे लोक डोंगरात राहतात त्यांना दरडीची भीती असते. तर जे जमिनीवर राहतात त्यांना पाण्याची भीती असते, असंही या तरुणांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं.

काळजी करू नका, फक्त स्वत:ला सावरा

मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना धीर दिला. परिस्थिती प्रचंड अवघड होती. भयानक स्थिती होती. सगळीकडे पाणी होतं. यंत्रणा लवकर पोहोचू शकली नाही. कालपासून आम्ही आर्मी आणि नेव्हीला पाठवलं होतं. पण पावसामुळे यंत्रणांना पोहोचता येत नव्हतं, असं सांगतानाच तुम्ही काळजी करू नका. तुमचं सर्वांचं पुनर्वसन केलं जाईल. तुमची कागदपत्रे गहाळ झालीत. त्याचीही चिंता करू नका, ते सर्व तुम्हाला मिळवून देऊ. तुमच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या सर्व आम्ही करू. तुम्ही फक्त स्वत:ला सावरा. तुम्ही काहीच चिंता करू नका. सर्व गोष्टी सरकारवर सोडा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

त्यांना मृत घोषित करू

मागच्यावेळी प्रमाणे यावेळीही दुर्घटनेत गायब झालेल्या लोकांचा दोन दिवस शोध घेऊ. त्यानंतरही कोणी सापडलं नाही तर त्यांना मृत घोषित करू, असं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिलं. (Maharashtra rains: CM Uddhav Thackeray assures of full support to taliye village people)

संबंधित बातम्या:

तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार

कागदपत्रांची चिंता करू नका, सर्वांना मदत करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात, दरड दुर्घटनेची पाहणी

महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

(Maharashtra rains: CM Uddhav Thackeray assures of full support to taliye village people)