लोकच नाही, देवही विस्कळीत; आपल्याच सरकार विरोधात गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक विधान?

राज्याचे पाणीपुरवठा गुलाबराव पाटील यांनी आपल्याच सरकार विरोधात खळबळजनक उद्गार काढलं आहे. आमचं सरकार आल्यापासून लोकच नाही तर देवही विस्कळीत झाले आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

लोकच नाही, देवही विस्कळीत; आपल्याच सरकार विरोधात गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक विधान?
gulabrao patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2023 | 12:32 PM

जळगाव : आम्ही सत्तेत आल्यापासून लोक विस्कळीत आहेत आणि देव पण… असं खळबळजनक विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चर्मकार समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात गुलाबराव पाटील यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गुलाबराव पाटील यांनी आपल्याच सरकारविरोधात असं विधान का केलं? अशी चर्चाही यावेळी रंगली आहे. यावेळी मेळावा सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा धागा पकडून गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

आता हा अवेळी पडणारा पाऊस आहे. त्यामुळे आम्ही तर हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्यावरही भाष्य केलं. पक्ष जे सांगेल तेच नेता करत असतो, तेच काम शरद पवारांनी केलंय. शेवटी ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्यांच्या पक्षाला जे वाटलं ते त्यांच्या कोअर कमिटीने केलं, असं त्यांनी सांगितलं.

तेच पवारांनी केलंय

राष्ट्रवादीतल्या घडामोडी ही शेवटी त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्यांच्या पक्षाला जे वाटलं ते त्यांच्या कोअर कमिटीने केलं. त्याचं स्वागत शरद पवारांनी केलंय. शेवटी नेता हा पक्ष आणि कार्यकर्त्यांना बांधील असतो. तो असलाच पाहिजे. तेच शरद पवार यांनी केलं आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

दोन गुलाबराव एकाच मंचावर

चर्मकार समाजाच्या कार्यक्रमानिमित्ताने एकाच व्यासपीठावर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे एकत्र दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ आणि शिंदे गटाचे मंत्री हे एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे दोन्ही गुलाबराव जळगावातील धरणगाव येथील चर्मकार समाजाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आल्याने चर्चांना उधाण आलं. यावेळी गुलाबराव वाघ यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी मंत्री बबनराव घोलप यांचीही उपस्थिती होती.