नवीन बुलेट खरेदी करुन मायलेक घरी येत होते, वाटेत बुलेट बंद पडली म्हणून थांबले अन् हा शेवटचा प्रवास ठरला !

| Updated on: May 23, 2023 | 9:12 AM

मुलाला नवीन बुलेट घेण्यासाठी कड्यालवर कुटुंब नागपूरला गेलं होतं. नागपुरहून बुलेट घेऊन घरी परतत असताना बुलेट वाटेत बंद पडली अन् मग कुटुंबावर शोककळाच आली.

नवीन बुलेट खरेदी करुन मायलेक घरी येत होते, वाटेत बुलेट बंद पडली म्हणून थांबले अन् हा शेवटचा प्रवास ठरला !
चंद्रपूरमध्ये टिप्परच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

चंद्रपूर : नवीन बुलेट खरेदी करुन मायलेक घरी परतत होते. मात्र वाटेतच नवीन बुलेट बंद पडली. यामुळे दोघेही रस्त्यावर थांबले होते. मुलगा बुलेट चेक करत होता. इतक्यात भरधाव टिप्पर आला अन् मायलेकाला धडक देऊन गेला. यात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कल्पना रमाकांत कड्यालवार आणि साहिल रमाकांत कड्यालवार अशी मयत मायलेकाची नावे आहेत. मयत आई आणि मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

कड्यालवार कुटुंब बुलेट घेऊन नागपुरहून परतत होते

सिंदेवाही येथील रमाकांत कड्यालवार हे मुले आणि पत्नीसह नागपूरला गेले होते. मुलास दुचाकी विकत घ्यायची होती, तर त्यांना दवाखान्यात काम होते. कामे आटोपून नागपूरवरून ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान सिंदेवाहीच्या दिशेने निघाले. यावेळी रमाकांत यांचा लहान मुलगा साहिल याने बुलेटवर आईला घेतले तर मोठा मुलगा समीर हा वडील रमाकांत आणि एका ओळखीच्या व्यक्तीसह त्यांच्या कारने निघाले. बुलेट पुढे आणि कार मागे असा प्रवास सुरू होता.

वाटेत गाडी बंद पडली अन् घात झाला

नागपूरवरून येत असताना नवीन बुलेट दोनदा बंद पडली. काही वेळाने ती सुरूही होत होती. पुन्हा नागभीड-तळोधी दरम्यान असलेल्या बोकडोह पुलावर बुलेट बंद पडली. या बंद पडलेल्या बुलेटजवळ समीरने कार उभी केली. समीरचा लहान भाऊ साहिल आणि आई बुलेटजवळच उभे होते. एवढ्यात नागभीडकडून येणाऱ्या भरधाव टिप्परने चारचाकी आणि बुलेटला धडक देऊन पसार झाला. या धडकेने बुलेटजवळ उभे असलेला साहिल आणि आई कल्पना पुलाखाली पडले. यात त्यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

तर कारमध्ये बसलेल्या रमाकांत यांच्या पायाला जबर दुखापत झाली. मोठा मुलगा समीर याने तातडीने पोलिसांना ही माहिती दिल्याने पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रमाकांत यांना नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.