बाजार समितीतील निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला, खासदारांची माजी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका

वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच कार्यकर्त्यांचं काम केलं नाही. आमदाराला निधी दिला नाही. कार्यकर्ते मजबूत केले नाही असा आरोप खासदार धानोरकर यांनी केला.

बाजार समितीतील निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला, खासदारांची माजी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका
| Edited By: | Updated on: May 01, 2023 | 6:54 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. चंद्रपुरात काँग्रेसची जबाबदारी असलेल्या खासदार धानोरकर यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यावरून माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी खासदार धानोरकर यांच्यावर समर्थकांमार्फत टीका चालवली आहे. त्यावर खासदार बाळू धानोरकर यांनी उत्तर दिले आहे. खासदाराने आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र पाहून टाकतो असे आव्हान खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना दिले.

खासदार धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळे विरोधी पक्षनेते आणि मंत्री झाल्याचा दावा केला. मात्र वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच कार्यकर्त्यांचं काम केलं नाही. आमदाराला निधी दिला नाही, कार्यकर्ते मजबूत केले नाही असा आरोप खासदार धानोरकर यांनी केला.

म्हणून त्यांना मंत्रीपद मिळाले

बाळू धानोरकर म्हणाले, या लोकसभा क्षेत्रात सर्वात जास्त बाजार समित्या माझ्या आल्या आहेत. विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरीचे आमदार आहेत. मी एकमेवर खासदार निवडून आल्यानंतर वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले. तीन आमदार आणि एक खासदार या जिल्ह्यातून निवडून आले. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळालं होतं.

आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही

त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे स्टेटमेटं केलं ते अतिशय चुकीचं आहे. बाळू धानोरकर सक्षम आहे. लोकसभा लढणाऱ्यानं लढावं आम्ही पक्षाचं काम करू. आम्ही तुमची ब्रम्हपुरी पाहू शकतो. आम्ही आमची लोकसभाही पाहू शकतो. आमच्या लोकसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही आघाडी घेतली आहे. आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही, असा इशारा बाळू धानोरकर यांनी दिला.

राजकारण हा आमचा धंदा नाही

बाळू धानोकर हा १२ दिवसांत निवडून आला. विजय वडेट्टीवार यांनाही अथॉराईज्ड केलं होतं. तेव्हा त्यांनी लोकसभा लढायला हवी होती. अजूनही या आणि लोकसभा लढा आम्ही माघार घेतो, असंही बाळू धानोकर यांनी म्हंटल. राजकारण हा आमचा धंदा नाही. आम्ही व्यवसायिक लोकं आहोत.

विजय वडेट्टीवार यांना कुठल्या कार्यकर्त्यांची कुठली काम केली, हे समोर काढा. कार्यकर्त्यांना निधी दिला नाही. हे प्रश्न उपस्थित आहेत. माझं आणि वडेट्टीवार यांचं काही वैरत्व नाही. पण, खासदारांनी त्यांचे क्षेत्र सांभाळले नाही, असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं असल्याचंही धानोरकर म्हणाले.