CCTV Video : अहमदनगरमध्ये दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Jun 04, 2022 | 6:26 PM

दरोडेखोरांनी प्रथम वाचमनला मारहाण करून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला खुर्चीवर बांधून ठेवले. नंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे 42 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदिचे दागिने चोरले. त्याचबरोबर त्यांच्या शेजारच्या दोन घरात दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत होते. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला गुप्त खबऱ्यामार्फत घटनेची माहिती मिळाली.

CCTV Video : अहमदनगरमध्ये दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद
अहमदनगरमध्ये दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी चार आरोपीं (Accused)च्या पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी रोडवर सातपीर बाबा दर्गा परिसरात आज पहाटे ही घटना घडली. सुमारे एक तास सुरू असलेल्या या थरारा दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यांवर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला (Attack) केलाय. घटनेचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मयुर राजू ढगे, ईश्वर अशोक मोरे, रमेश वाकोडे आणि रणजित केशव कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दरोडे टाकत असतानाच गुप्त बातमीदाराकडून पोलीस पथकाला याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा पाठलाग केला.

तीन घरांवर दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत होते चोरटे

प्रमोद रत्नाकर भागवत हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडलगत असलेल्या सातपीर दर्गा परिसरात रहावयास आहेत. ते त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन पाच दरोडेखोरांनी 4 जून रोजी पहाटे 3 च्या दरम्यान त्यांच्या घरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी प्रथम वाचमनला मारहाण करून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला खुर्चीवर बांधून ठेवले. नंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे 42 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदिचे दागिने चोरले. त्याचबरोबर त्यांच्या शेजारच्या दोन घरात दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत होते. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला गुप्त खबऱ्यामार्फत घटनेची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, हवालदार महेश शेळके, आजिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाय, पोलीस नाईक नदीम शेख, जालिंदर साखरे आदी पोलिस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. सिने स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला.

पाठलाग करत असताना दरोडेखोराचा पोलिसावर हल्ला

यावेळी एका दरोडेखोराने सत्तूरने पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. तरी देखील जिवाची पर्वा न करता पोलिस पथकाने चार दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले. या घटनेत आरोपी मयुर राजू ढगे आणि ईश्वर अशोक मोरे, दोघे राहणार नाशिक यांना जागेवर पाठलाग करून पकडले. तर रमेश वाकोडे, राहणार अहिल्यादेवी नगर निफाड आणि रणजित केशव कांबळे, राहणार कुंदे गल्ली निफाड या दोघांना शिर्डी येथून ताब्यात घेतले. तसेच अजय पवार राहणार निफाड हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दरोडेखोरांपैकी मयुर ढगे याने पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला असून त्याच्यावर नाशिक शहर येथे हत्येसारखे दहा गंभीर स्वरूपाचे व प्रॉपर्टी संबंधी गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथकाच्या या धाडसी कारवाईचे मोठे कौतुक केले जात आहे. (Robbers attack police sub-inspector in Ahmednagar, incident captured on CCTV)