
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वनपरिक्षेत्रात गस्तीवर असलेल्या वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांवर 40 ते 45 मेंढपाळांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना मंगळवारी (10 ऑगस्ट) दुपारी खामगाव वनपरिक्षेत्रात असलेल्या पिंपळगाव नाथ परिसरात घडली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी आपल्या बंदुकीतून हवेत 3 फायर केल्याने मेंढपाळ घटनास्थळावरून पसार झाले आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचला.
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात गुरे चरण्यास मनाई आहे. मात्र, मनाई असतानाही या ठिकाणी अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यास आणतात. या भागात पावसाळ्यात हिरवळ असल्याने चरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 10 ऑगस्टला दुपारी अशीच माहिती गस्तीवरील कर्मचाऱ्यांना मिळाली.
यानंतर हे कर्मचारी पिंपळगाव नाथ भागात असलेल्या मेंढपाळांकडे गेले आणि त्यांना हटकले. त्यावेळी त्यांनी वनकर्मचाऱ्यांवर लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी सुरुवातीला आपल्या बंदुकीतून हवेत एक गोळी फायर केली.
गोळीबार केल्यानंतर त्याठिकाणी असलेले 10 ते 12 मेंढपाळ पळून गेले. मात्र, थोड्यावेळाने मेंढपाळांनी आपल्या इतर साथीदारांना बोलावले. यावेळी 40 ते 45 मेंढपाळांनी वनकर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मेंढपाळांकडे लाठ्या काठ्या आणि शस्त्रे असल्याने वनकर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो म्हणून उपस्थिती वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी आपल्या बंदुकीतून दोन वेळा हवेत फायर केले. त्यामुळे हल्ला करणारे मेंढपाळ घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, वनाधिकाऱ्यांनी या मेंढपाळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Shepherd attack on forest officer in buldhana