रवींद्र इंगोले ! एक लाख मजुरांना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणारा अवलिया

'गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा', या राष्ट्रसंत तुकडोजी महारांच्या ग्रामगीतेतील ओळी गावचे महत्त्व विशद करतात.

रवींद्र इंगोले ! एक लाख मजुरांना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणारा अवलिया
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र इंगोले
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Jul 15, 2021 | 3:10 PM

वाशिम : ‘गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा’, या राष्ट्रसंत तुकडोजी महारांच्या ग्रामगीतेतील ओळी गावचे महत्त्व विशद करतात. याच संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून देशातील खेडेगाव समृद्ध होऊन तेथील कष्टकरी मजुरवर्गाचे जीवनमान सुकर व्हावे याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील मजुरांना होऊन त्यांचे स्थलांतर थांबून गावातच त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता एक अवलिया निस्वार्थपणे झटत आहे. आतापर्यंत ‘जागर मनरेगाचा’ ही संकल्पना घेऊन 237 गावात शिवारफेरी काढून तब्बल एक लाख मजुरांना त्यांच्या गावातच हक्काचा रोजगार या ध्येयवेड्या तरुणाने उपलब्ध करून दिला आहे.

वाशिम जिल्ह्यातील जलदुत रवींद्र इंगोले यांचा स्तुत्य उपक्रम

पूर्वीच्या रोजगार हमी योजनेत आवश्यकते बदल करून 2005 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नव्याने कार्यान्वित करण्यात आली. गावातील कष्टकरी मजूरवर्गाला स्थलांतर न करता त्यांच्या गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गावाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या योजनेची माहीत मजुरांना व्हावी, त्यांची रोजगारा करीता होणारी भटकंती थांबावी, याकरीता वाशिम जिल्ह्यातील जलदुत रवींद्र इंगोले हा तरुण कुठल्याही मानधना शिवाय निस्वार्थपणे झटत आहे.

पथनाट्यांमधून जनजागृती

मनरेगा ही योजना सहज सोप्या माध्यमातून मजुरांना समजावी याकरीता रवींद्र इंगोले यांनी ‘जागर मनरेगाचा, हे पथनाट्य तयार केले आहे. याद्वारे वातावरण निर्मिती, गावाचा विकास आराखडा तयार करणे, जॉब कार्ड, काम मागणी अर्ज, मनरेगा मजुरांचे अधिकार, मजुरांना कामगार कल्याण विभागामार्फत मिळणारे फायदे या बाबी ते खेळाच्या माध्यमातून मजुरांना समजावून सांगतात. याकरीता त्यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील 237 गावात शिवारफेरी काढली आहे. त्यांनी या उपक्रमातून एक लाख मजुरांना त्यांच्या गावातच हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

‘ओस पडत चाललेल्या खेड्यांना गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न’

मनरेगा योजनेअंतर्गत गावतालाव, वृक्ष लागवड, भूमिगत बंधारे, जलाशयाचे खोलीकरण यांसारखी कामे करणे शक्य असून यासर्व कामांवर गावातील मजुरांना वर्षभर सहज रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कष्टकऱ्यांच्या उपजीविकेचा पाया मजबूत करून सामाजिक सहभागाची सकारात्मकता वाढविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. मजुरांच्या स्थलांतरामुळे ओस पडत चाललेल्या खेड्यांना गतवैभव प्राप्त होऊन मजुरांच्या जीवनात समृद्धी यावी हा आपला प्रयत्न असल्याचे रवींद्र इंगोले सांगतात (social activist Ravindra Ingole who work for rural employment in Washim).

हेही वाचा : Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी निकाल!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें